NGN News
Latest Marathi News

नाशिक ‘मध्य’ मधील घर क्रमांक 3892.. 800 नव्हे केवळ तीन मतदार !

  • उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांचा खुलासा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक मध्य विधानसभा मतदार संघामध्ये 3829 या घर क्रमांकावर 800 पेक्षा अधिक मतदारांची नोंद असल्याबाबतची बातमी विविध माध्यमांत प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार जुने नाशिक शहरातील संबंधित घर क्रमांक 3829 वर नोंद असलेल्या मतदारांची पडताळणी केली असता या घर क्रमांकावर 800 पेक्षा अधिक मतदारांची नोंद नसून केवळ 3 मतदार असल्याची नोंद मतदार यादीत नमूद असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी दिली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या खुलाशानुसार याच मतदार संघातील घर क्रमांक 3892 असा पत्त्यामध्ये उल्लेख असलेल्या 800 पेक्षा अधिक मतदारांची नोंद असून त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका आणि मतदार नोंदणी अधिकारी 124- नाशिक मध्य विधानसभा मतदार संघ यांना याबाबतची पडताळणी करण्याबाबत निर्देशित करण्यात आले असता त्यांच्याकडून खालील प्रमाणे प्राथमिक अहवाल प्राप्त झालेला आहे.

▪️ 124- नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील जुने नाशिक या परिसरातील घर क्रमांक 3892 हा सीटी सर्वे क्रमांक 4905/5 मधील असून त्याचे एकूण क्षेत्र सुमारे 1501.00 चौ.मी आहे. या ठिकाणी सुमारे 700 निवासी/ अनिवासी या बांधीव मिळकती असुन प्रत्येक मिळकतीस मिळकत/ इंडेक्स क्रमांक हा वेगळा आहे. म्हणजेच घर क्रमांक 3892 ही एकच सदनिका/ इमारत नसून त्यात सुमारे 700 निवासी/ अनिवासी या बांधीव मिळकतींचा समावेश आहे. त्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असल्याचे दिसून येते

▪️ घर क्रमांक 3892 ही एकच सदनिका/ इमारत नसल्याचे तसेच तेथील मिळकत अनेक व्यक्तींच्या म्हणजेच एकूण साधारण 700 व्यक्तींच्या नावावर दिसून येत असल्याने एकाच घरात 800 पेक्षा जास्त मतदार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे दिसून येते, असा खुलासा उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सरदेसाई यांनी केला आहे.

विरोधकांचे आरोप ….

दरम्यान, नाशिक मध्य मतदारसंघातील या मुद्द्याने अलीकडे उचल खाल्ली आहे. राज्यातील ज्या मतदारसंघात मतदार यादीत घोळ आढळून आले, त्यामध्ये नाशिक मध्य चा समावेश असल्याचा दावा विरोधी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. 3829 या घर क्रमांकावर 800 पेक्षा अधिक मतदारांची नोंद असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर त्याला आता प्रशासकीय स्तरावर उत्तर देण्यात आले आहे.

Comments are closed.