शिवसेना उबाठा पक्षाला धक्का; सिन्नरमध्ये समीकरणे बदलणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्याचे क्रीडामंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी ठाकरे यांची साथ सोडत गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारत कोकाटे यांचा पक्ष प्रवेश पार पडला. त्यांच्या प्रवेशाने सिन्नर तालुक्यातील समीकरणे बदलणार असल्याची चर्चा यानिमित्त सुरु झाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. तीन वर्षांपूर्वी भारत कोकाटे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यांचे तिथे फार मन रमले नाही. भारत कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपात स्वागत करतो, असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले. कोकाटे हे सिन्नरच्या सोमठाणे गावाचे सरपंच राहिलेले आहेत. सिन्नर तालुक्यात त्यांची चांगली राजकीय ताकद आहे. भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेत फायदा होऊ शकतो, असे आडाखे बांधून कोकाटे यांना भाजपमध्ये घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Comments are closed.