NGN News
Latest Marathi News

युवा लेखिका मृणाल पाटील गिरणा प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित

  • सामाजिक योगदानाची दखल ; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

समाजासाठी केलेले कार्य हेच खरी संपत्ती असते,या विचारांची प्रचीती देणाऱ्या युवा लेखिका मृणाल पाटील यांना यंदाचा ‘गिरणा प्रेरणा गौरव पुरस्कार’ जाहीर झाला असून, रविवारी (दि. १२ ) नाशिक येथील प. सा. नाट्यगृहात झालेल्या भव्य समारंभात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे मागील २७ वर्षांपासून समाजकार्य, साहित्य, संस्कृती, शिक्षण, कला आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याची परंपरा जपली जाते. या वर्षीच्या सन्मानार्थी म्हणून मृणाल पाटील यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या प्रसंगी चित्रपट अभिनेत्री सुरेखा शर्मा, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, प्रतिभा म्हस्के, भारती निकम, शितल कुयटे, भाग्यश्री चौधरी, तसेच डॉ. सुमती पवार, शकुंतला वाघ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, कवी राजेंद्र उगले, राजेश्वर शेळके यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितले की, “समाजासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यामागचा उद्देश म्हणजे त्यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी. यंदा मृणाल पाटील यांच्या सन्मानाने ही परंपरा अधिक उज्वल झाली आहे.”

मृणाल पाटील यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे महिलांना सबलीकरण, शिक्षण, व आत्मविश्वासाचा नवा मार्ग दाखवला आहे. त्यांचे कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी ठरत असून, हा सन्मान त्यांच्या जिद्द, सामाजिक संवेदनशीलता आणि कार्यतत्परतेचे प्रतीक आहे.

या पुरस्काराने मृणाल पाटील यांचे कार्य नव्या उंचीवर पोहोचले असून, आगामी काळातही त्यांच्या उपक्रमांतून समाजाला प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Comments are closed.