NGN News
Latest Marathi News

मंत्री माणिकराव कोकाटे पक्षाकडून तीन जिल्ह्यांचे संपर्कमंत्री नियुक्त !

  • पक्षाकडून घोषणा; नाशिकसह धुळे आणि जळगावची जबाबदारी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या पक्षाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करताना ज्येष्ठ नेते आणि क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठी जबाबदारी दिली आहे. त्यानुसार, कोकाटे यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नव्या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे हे नाशिकसह धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांचे संपर्कमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. या निर्णयामुळे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती आखत असल्याचे स्पष्ट होत आहे. यात संघटन बळकट करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

 खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या ..

कोकाटे यांची निवड संपर्क वाढवणे, पक्षाचे संघटन मजबूत करणे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त यश मिळवणे या तीन मुख्य उद्दिष्टांसाठी करण्यात आली आहे. संपर्कमंत्री म्हणून कोकाटे यांना तिन्ही जिल्ह्यांमधील स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे आणि त्यांच्यातील गटबाजी संपुष्टात आणणे, ही महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. सोबतच निवडणुकीपूर्वी बुथ पातळीपर्यंत पक्षाचे संघटन सक्रिय करणे आणि नवीन सदस्यांची नोंदणी करणे, निवडणुकीसाठी योग्य आणि प्रभावी उमेदवार निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे तसेच पक्षाच्या प्रचाराची रणनीती आखणे, शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून पक्षाची प्रतिमा सुधारणे या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असणार आहेत.

Comments are closed.