प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून नियुक्तीपत्र
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कॉंग्रेस सोडून शिंदेसेनेत प्रवेश करून अवघ्या एक महिन्यातच पक्षाबाहेर पडलेल्या आणि राजकीय करियरसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात गेलेल्या डॉ. हेमलता पाटील यांना पुन्हा प्रदेश स्तरावर काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. कारण पक्षाने त्यांना प्रदेश प्रवक्तेपद बहाल केले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी डॉ. पाटील यांना तसे पत्र पाठवले आहे.
अनेक वर्षे कॉंग्रेस पक्षाचे काम करताना डॉ. हेमलता पाटील यांनी नाशिक महापालिकेत नगरसेवक, विरोधी पक्षनेतेपद, प्रदेश प्रवक्ता अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०१९ मध्ये त्यांनी नाशिक मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यांचा पराभव झालेला असला तरी त्यांना लक्षणीय मते मिळाली होती. मात्र २०२४ मध्ये जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाला गेल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पुढे शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र स्थानिक गटबाजीमुळे महिनाभरात त्या पक्षातून बाहेर पडल्या. अलीकडे त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Comments are closed.