NGN News
Latest Marathi News

मोठ्या उद्योग सुविधांसाठी प्राथमिकता देणार : जिल्हाधिकारी जलज शर्मा

‘निमा’ मध्ये मोठ्या उद्योगांसाठी प्रथमच स्वतंत्र बैठक

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या व निमाच्या प्रयत्नांना बळकटी देणाऱ्या मोठ्या उद्योजकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जातील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमची दारे नेहमी खुली राहतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींसमोर केले.

‘निमा’ कार्यालयात जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत प्रथमच स्वतंत्र संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर ‘निमा’चे अध्यक्ष आशिष नहार, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, कार्यकारी अभियंता जयवंत पवार, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, आयमाचे अध्यक्ष ललित बुब, निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल, किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहा सचिव तथा मोठे उद्योग समन्वयक समिती अध्यक्ष किरण पाटील उपस्थित होते.

एक खिडकी योजना सुरु करणार..

उद्योग क्षेत्र हा राज्याच्या विकासाचा कणा आहे. मोठ्या उद्योगांमुळे शेकडो लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळते. शासनाला सर्वाधिक महसूल या क्षेत्राकडूनच मिळतो. अनेकांना सक्षम रोजगार या उद्योगांमुळे मिळत असतो. त्यामुळे या क्षेत्राकडे आमचे प्राधान्याने लक्ष असते. मोठ्या उद्योगांना विविध परवानग्या मिळविण्यासाठी एक खिडकी योजना उघडून उद्योजकांचे काम विनासायास कसे होईल, यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे भक्कम यंत्रणा उभी करण्याचा मानसही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलून दाखवला.

मुलभूत सुविधा विषयांवर चर्चा ..

मोठ्या उद्योग क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या त्यात जिल्ह्यात साकारणाऱ्या डायपोर्ट उभारणीस गती, औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा , कुशल कामगार घडविण्याची गरज, विनाखंड वीज पुरवठा आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. नाशिक शहराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

कुशल मनुष्यबळ देऊ : नहार

मोठ्या समूहांनी आपल्या उद्योगांचा विस्तार देखील नाशिक परिक्षेत्रात करावा असे आवाहन निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी केले. उद्योजकांना अखंड वीजपुरवठा व्हावा, यासाठी ४०० केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र व सीईटीपीचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. कुशल कामगारांच्या पुरवठ्यासाठी टाटा समूहासमवेत निमाचा सामंजस्य करार झाला असून लवकरच स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू होणार आहे. उद्योजकांनी कुशल मनुष्यबळाची मागणी नोंदवावी. ते उपलब्ध करून देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू असे नहार यांनी सांगितले.

या प्रमुख समूहांची उपस्थिती..

मोठ्या उद्योग समूहांपैकी एबीबी, सीजी पॉवर, ज्योती स्ट्रक्चर, बिल केअर लिमिटेड, ब्ल्यू क्रॉस लिमिटेड, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल, ग्राफाईट इंडिया लिमिटेड, सॅम्सोनाइट, आनंद आय पॉवर, दालमिया भारत, आयएमपीएस लिमिटेड, इमर्सन लिमिटेड, शारदा मोटर्स , हेल्डेक्स इंडिया, लीग्रँड, टीडीके, केपरिहांस आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत नितीन वागस्कर, अखिल राठी, कैलास पाटील, नितीन आव्हाड, किरण जैन, वैभव जोशी, रवींद्र झोपे, संजय महाजन, प्रवीण वाबळे आदी उद्योजक उपस्थित होते.

Comments are closed.