- मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शाळांमधील नियमित हजेरी तसेच अभिलेख व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. अनेक शाळा अजूनही बंद आहेत, तर काहींचे अभिलेख पावसामुळे भिजले आहेत. त्यामुळे ३० सप्टेंबर २०२५ रोजीची पटसंख्या वास्तव दर्शवू शकत नाही. या पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबर ऐवजी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरावी, अशी मागणी शिक्षकनेते आबासाहेब शिंदे यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
शिंदे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पावसामुळे महापूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले असून, अनेक शाळांना काही दिवस बंद ठेवावे लागले आहे. त्यामुळे ठरवलेल्या ३० सप्टेंबर या तारखेला घेतलेली पटसंख्या वास्तव परिस्थितीचे प्रतिनिधित्व करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवाय, यू-डायस प्लस (U-DISE Plus) या पोर्टलवर शाळांची माहिती भरण्याच्या प्रक्रियेतही अडचणी निर्माण झाल्या आहेत. इंटरनेटची अनुपलब्धता, शाळांचे अभिलेख भिजल्यामुळे झालेल्या अडथळ्यांमुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे संबंधित माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सुचवले आहे.
शाळांची मान्यता, अनुदान, शिक्षकसंख्या आणि सेवासुरक्षा या सर्व गोष्टी पटसंख्येवर अवलंबून असल्याने, चुकीची आकडेवारी शैक्षणिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम करू शकते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवासुरक्षेसाठी ३१ ऑक्टोबर २०२५ ही तारीख पटसंख्या नोंदणीसाठी ग्राह्य धरावी, अशी श्र. आबासाहेब शिंदे यांनी मुख्यमंत्री व शिक्षण विभागाकडे केली आहे.
“राज्यातील अनेक शाळा अजूनही पूर्वपदावर आलेल्या नाहीत. शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन वास्तव परिस्थितीचा विचार करावा आणि तात्काळ निर्णय घ्यावा,” असे आवाहन श्री. आबासाहेब शिंदे यांनी आपल्या पत्राद्वारे केले आहे. शैक्षणिक हिताचा विचार करून शिक्षण मंत्र्यांनी तातडीने आदेश काढावेत, जेणेकरून कोणत्याही शाळेचे नुकसान होणार नाही, अशी त्यांनी विनंती केली आहे.
Comments are closed.