नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे थाटात उद्घाटन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
देशातील नागरिकांना राजकीय अधिकार देण्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता देण्याची गरज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती. आजच्या काळात ही समानता निर्माण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय नूतन आधुनिक इमारतीचे उद्घाटन व वाहनतळाचे भुमीपूजन सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर, न्या. रेवती डेरे मोहिते, न्या. एम.एन. सोनम, न्या. आर. व्ही. घुगे, न्या. ए.एस. गडकरी, न्या. मकरंद कर्णिक, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष ॲड नितीन ठाकरे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य जयंत जायभावे, ॲङ अविनाश भिडे यांचेसह बार कौन्सिल व वकिल संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरन्यायाधीश श्री. गवई म्हणाले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण झाली तरच या लोकशाहीला अर्थ असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. स्वातंत्र्याबरोबरच समानता हवी, यासाठी त्यांचा आग्रह होता. आजच्या काळातही हे तंतोतंत लागू पडते. बंधुत्व आणि बंधुभाव हे दोन्ही आवश्यक असून सामाजिक आणि आर्थिक समानतेकडे वाटचाल करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.
सर्वात सुंदर जिल्हा न्यायालय इमारत
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे त्यांनी कौतुक केले. देशात महाराष्ट्रातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधांविषयी चर्चा होते. येथील पायाभूत सुविधा या निश्चितपणे चांगल्या आहेत. देशातील सर्व जिल्हा न्यायालय इमारतींमध्ये ही इमारत अतिशय सुंदर अशी आहे. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती असताना या इमारतीच्या भूमिपूजनाला उपस्थित होते आणि आपल्याच हस्ते उद्घाटन होणे आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालय इमारत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणे हा आनंदाचा क्षण असल्याचे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर म्हणाले, नाशिक जिल्हा न्यायालय इमारतीला एक इतिहास आहे. अनेक उत्तमोत्तम वकील आणि न्यायाधीश येथून तयार झाले. ही केवळ एक इमारत राहणार नाही तर नाशिकची वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी, नाशिक वकील संघाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांना सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती ..
या कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह वकिल संघाचे प्रतिनिधी, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, वकिल व त्यांचे कुटूंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या न्यायालय इमारतीची वैशिष्टये :
» सात मजली पर्यावरणपूरक इमारत.
» एकूण ४४ न्यायालयांचा समावेश.
» पोक्सो, महिलांसंदर्भातील खटले, एटीएस व सीबीआयसाठी स्वतंत्र कोर्ट.
» व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा.
» दिव्यांगनुकूल वास्तू.
▶ वकिलांसाठी प्रशस्त दालने व ग्रंथालय.
▶ ३५० ते ४०० व्यक्तींची क्षमता असलेले भव्य ऑडिटोरियम असेल.
» आधुनिक अभिलेख कक्ष, प्रतीक्षालय व प्राथमिक उपचार केंद्र.
» स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष.
» पीडित व साक्षीदारांसाठी सुरक्षित व्यवस्था.
» दीड हजार दुचाकी व साडेचारशे कार पार्किंगची क्षमता.
▶ टायपिस्ट, झेरॉक्स, न्यायालयीन कर्मचारी, वकील परिषदेसाठी स्वतंत्र जागा.
Comments are closed.