नाशिककरांसाठी ‘अब दिल्ली दूर नही..’
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गेल्या महिनाभरापूर्वी जमिनीवर आलेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवेने ‘टेक ऑफ’ घेतला असतानाच आता दिल्लीला प्रवास करू इच्छिणाऱ्या नाशिककरांसाठी ‘गुड न्यूज; आहे. कारण येत्या दोन महिन्यात नाशिक-दिल्ली विमान प्रवासासाठी आणखी एक सेवा सुरु होणार आहे. यासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे.
गेल्या काही दिवसांत वेळापत्रक बिघडलेल्या नाशिकची हवाई सेवा आता खऱ्या अर्थाने सुरळीत झाली आहे. तूर्तास नाशिकहून इंडिगो कंपनी विमानसेवा पुरवत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विस्कळीत झालेली नाशिक-जयपूर ही इंदूरमार्गे असलेली विमानसेवा देखील लवकरच सुरळीत होणार असल्याचे वृत्त आहे. नाशिक ते इंदूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय, इंदूरहून कनेक्टेड फ्लाईटस उपलब्ध असल्याचा दुहेरी लाभ नाशिककरांना होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, नवी नाशिक-दिल्ली विमानसेवा रात्रीच्या वेळी असण्याची शक्यता आहे. ओझर विमानतळावरून रात्री निघालेले विमान काही तासात दिल्ली गाठणार असणार असल्याने दिवसा कामे आटोपून पुन्हा रात्री परतणे प्रवाशांना शक्य होणार आहे.
@ नाशिक-दिल्ली विमान प्रवासासाठी अतिरिक्त सेवा लवकरच सुरु होणे निश्चित झाले आहे. त्याची औपचारिक घोषणा लवकरच होईल. अलीकडे नाशिकचे सर्वार्थाने महत्व वाढलेले असताना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा देशातील सर्व प्रमुख शहरांशी ‘कॅनेक्ट’ राहावा, यासाठी ‘निमा’च्या एव्हीएशन समितीचे अव्याहत प्रयत्न असतात. सध्या ओझर ( नाशिक ) विमानतळावरून दिल्ली, बंगळूरू, हैदराबाद, अहमदाबाद, गोवा याठिकाणी विमानसेवा सुरु आहे. इंदूर-जयपूर सुरु होण्याच्या मार्गावर आहे , तर कोलकाता, चेन्नई, वाराणसी, लखनऊ, पंजाब आणि राजस्थान ही ठिकाणे नाशिकला ‘कॅनेक्ट’ होण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.
- मनीष रावळ, उपाध्यक्ष ‘निमा’ एव्हीएशन समिती, नाशिक
Comments are closed.