** एनजीएन न्यूज नेटवर्क
आपल्या सहा दशकीय राजकीय वाटचालीत बहुतांश काळ विरोधक म्हणून राहिलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ऊर्जा अन् उत्साहाबाबत नेहमीच चर्चा होत असते. राजकीय उर्जितावस्थेत सगळेच नेते जनतेशी नाळ जुळवून असतात. निवडणूकीत दणका मिळाला की लुप्त होतात. शरद पवार मात्र त्याला अपवाद आहेत. सत्ता गेली, पक्षाला उभा छेद गेला, बड्या नेत्यांनी साथही सोडली, मात्र एकांड्या शिलेदाराप्रमाणे पक्ष जिवंत ठेवण्यासाठी अहर्निश कार्यरत राहून ते दिशा देतात. बरं, हे करताना वयोमान अथवा प्रकृतीच्या भिंती उभ्या राहू न देणे, हा त्यांचा गुण उभ्या राजकारण्यांसाठी आदर्श ठरावा. अलीकडील त्यांचा नाशिक दौरा निवडणूक हरलेल्या त्यांच्या सवंगडी पक्षांसाठी तरी किमान वस्तुपाठ ठरावा.
लोकसभा निवडणूकीत लिलया कामगिरीची नोंद करताना शरद पवार यांनी त्यांच्या खास पसंतीच्या दिंडोरीतही देदिप्यमान विजय प्राप्त केला. केंद्रीय मंत्र्याला एका सामान्य शिक्षकाने आसमान दाखवणे खरोखर सोपे नव्हते. शिवाय, दिंडोरी क्षेत्रातील सहापैकी एकाही विधानसभा मतदारसंघात पक्षाचा आमदार नसताना केवळ कार्यकर्त्याच्या भरवशावर पवारांनी मैदान मारले. विधानसभेत मात्र हा ‘टेम्पो’ पक्षाला आणि एकूण महाविकास आघाडीला टिकवता आला नाही. मालेगाव बाह्य वगळता अवघ्या जिल्हाभरातील मतदारसंघांत महायुतीचा बोलबाला राहिला. महायुतीच्या दिग्विजयाने विचलित होतील ते पवार कसले. अनायासे विविध कारणांनी ‘पॅनिक’ असलेल्या शेतकऱ्यांची कड घेण्याच्या हेतूने पवारांनी नाशिक हेरले. आदल्या दिवशी कार्यकर्ता शिबिर आणि दुसऱ्या दिवशी शेतकरी आक्रोश मोर्चा अशा प्रयोजनाने पवार पक्षाच्या बिनीच्या नेत्यांसह नाशिक मुक्कामी होते.
‘टायमिंग’ साधण्यात प्रवीण असलेल्या पवारांनी नव्या प्रदेशाध्यक्षांना कार्यकर्त्यांनी स्विकारण्याची मानसकिता तयार करण्यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ‘ऐक्याची वज्रमूठ’ आवळावी, या हेतूने कार्यकर्ता शिबिर घेतले. दुसरा दिवस पुनर्वैभव मिळवण्यात निर्णायकी भूमिकेत राहू शकणाऱ्या जनतेसाठी सार्थकी लावला. मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून राज्य सरकारची भूमिका ‘सोशल फॅब्रिक‘ला डंख मारणारी असल्याची हाकाटी पिटत पवारांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. ज्या शेतमालाच्या दरावरून बळीराजा अश्रू ढाळताेय, त्याची सरकार परवड करत असल्याचा मुद्दाही पवारांच्या पक्षाने मोर्चाद्वारे उचलला, ही बाब दखलपात्र ठरावी. कांदा निर्यातबंदी मुद्द्यावर दिंडोरीत केंद्रीय मंत्र्याचा पराभव घडून आला, ही बाब मनात साठवलेल्या पवारांनी आताही त्याकडे लक्ष वेधत मोर्चात स्वतः आसनस्थ झालेल्या वाहनाच्या पुढ्यात कांदा ठेवून बळीराजासोबत असलेली भावनिक समीपता अधोरेखित केली. सत्तेला भूलून पक्षासोबत प्रतारणा केलेल्यांच्या नावे बोटं मोडत बसण्याऐवजी आमचा भरवसा नेत्यांवर नाही तर जनता-जनार्दनावर आहे, हा सुप्त संदेश पवार तमाम राजकारण्यांना यानिमित्त देऊन गेले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांत महायुती विधानसभेचा द्वितीय अंक साधणार का, महाविकास आघाडी एकत्रित लढणार का, याचा ऊहापोह न करता पवारांनी आपल्या दोन दिवसीय नाशिक दौऱ्यात राजकीय बीजारोपण करण्यात यश मिळवले. कोणताही पराभव अंतिम नसतो, याचा वस्तुपाठ देताना त्यांनी नेते नाही तर जनता आणि कार्यकर्ते हेच एखाद्या राजकीय पक्षाचे भवितव्य असते, हे सत्य यानिमित्त स्वकीयांच्या गळी उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
सारांशात, अलीकडील काळात विसविशीत होवू पाहणारी सामाजिक वीण, सत्तेच्या धुंदीत सामान्यांचा विसर पडलेले कारभारी, सरकारी धोरणापायी विलाप करायची वेळ आलेला बळीराजा, सामाजिक प्रश्नावर निर्माण झालेली अस्थिरता या मुद्द्यांवर बोट ठेवून शरद पवार यांनी हळूवारपणे आगामी निवडणूकांसाठी शंखनाद केला, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
Comments are closed.