NGN News
Latest Marathi News

गोपीचंद पडळकर यांची भाजपमधून हकालपट्टी करा : दीपिका चव्हाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रप्रपंच

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट ) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका करून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला काळिमा फासला आहे. सभ्यतेच्या चौकटीला तिलांजली देणारे विधान करणाऱ्या पडळकर यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. जयंत पाटील यांच्यावरील पडळकरांची टीका केवळ एका नेत्यावरची व्यक्तिगत टीका नसून ती महाराष्ट्राच्या पिढ्यान्‌पिढ्या जपल्या गेलेल्या सुसंस्कृत राजकीय परंपरेवरच आघात असल्याचा ठपका चव्हाण यांनी पत्राद्वारे ठेवला आहे. या पत्रात त्या म्हणतात की, राजकारणात मतभेद असू शकतात, विचारधारा वेगवेगळ्या असू शकतात; पण त्या मांडताना सभ्यता आणि संयम ही किमान पातळी राखलीच पाहिजे. पडळकर यांच्या वक्तव्यातून मात्र बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडते. जयंत पाटील यांचे वडील स्व. राजारामबापू पाटील यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेले घट्ट नाते यामुळेच त्यांना लोकनेते म्हणून जनमानसात स्थान मिळाले. त्या परंपरेचा गौरव वाढविण्याऐवजी, पडळकर यांनी पाटील कुटुंबाच्या मातोश्रींवर केलेली अवमानकारक टीका लज्जास्पद असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पडळकर यांच्या वक्तव्यावर कारवाई झाली नाही, तर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटेल आणि भविष्यात महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का देणारे वक्तव्य थांबवणे कठीण होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पडळकर यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांची हकालपट्टीसह कठोर कारवाई करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी पत्राद्वारे केली आहे.

Comments are closed.