NGN News
Latest Marathi News

बडे उद्योग नाशिकच्या उंबरठ्यावर; अर्थकारणासह रोजगार निर्माणास नवा आयाम

महिंद्रा, ग्राफाईट इंडिया, एपिरोक एबी, व्हरच्युओसो समुह प्रकल्प साकारणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शहर आणि परिघातील औद्योगिक क्षेत्रांत विविध समूहांच्या वतीने मोठी गुंतवणूक करून प्रकल्प उभारण्याची करण्यात आलेली घोषणा नाशिकचे महत्व अधोरेखित करणारी असून ती आपल्याला विकासाच्या नव्या क्षितिजाकडे नेणारी असल्याची प्रतिक्रिया उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे. समूहांच्या निर्णयामुळे इतर मोठी गुंतवणूक नाशिकमध्ये येण्यास पूरक वातावरण तयार होईल, असा विश्वासदेखील यानिमित्त व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांत नाशिकसह इगतपुरी आणि दिंडोरी औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये महिंद्रा आणि महिंद्रा, ग्राफाईट इंडिया लिमिटेड, एपिरोक एबी, व्हरच्युओसो आदी बड्या समूहांचा समावेश आहे. यामधून होणाऱ्या प्रकल्पांमुळे नाशिक औद्योगिक परिसराचे अर्थकारण बदलणार आहेच, शिवाय मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माणाचे गणित साधले जाणार आहे. विशेषतः, स्थानिकांना रोजगार निर्माण होण्याची शक्यता बळावणार आहे. गेल्या अनेक वर्षांत इथे कोणताही बडा प्रकल्प न आल्याची खंत व्यक्त होत होती. नव्या समीकरणातून या चर्चा आता बंद होतील. याशिवाय, केंद्र आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार असल्याने नवी गुंतवणूक येण्यातील अडचणींचा उहापोह देखील यानिमित्त थांबेल, असा आशावाददेखील व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक औद्योगिक परिसरातील गुंतवणूकीवर दृष्टीक्षेप…

१. महिंद्रा आणि महिंद्रा : ₹10,000 कोटी पेक्षा अधिक
स्थान: इगतपुरी जवळ, नाशिक
उत्पादन: इलेक्ट्रिक वाहन
रोजगार: ~अंदाजे 5,000

२. ग्राफाईट इंडिया लिमिटेड : ₹4,761 कोटी
स्थान: मुंढेगाव, इगतपुरी, नाशिक
उत्पादन: सिंथेटिक ग्रॅफाईट अॅनोड मटेरियल
रोजगार: ~1,166

३. व्हरच्युओसो ओप्तोइलेक्ट्रोनिक्स – ₹800 कोटी
स्थान: दिंडोरी, नाशिक
उत्पादन: इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटर कम्पोनेंट्स
रोजगार: ~500

४. एपिरोक एबी : ₹350 कोटी
स्थान: गोटे दुगमाळा, 42 एकर MIDC, नाशिक
उत्पादन: खाण आणि बांधकाम उपकरण, R&D सुविधा, उत्पादन युनिट
रोजगार: ~200

————————-

@ वस्तुतः, नाशिकची ओळखच उद्यमनगरी म्हणून अनेक दशकांपासून आहे. स्वाभाविकच इथे पाय रोवण्यासाठी अनेक बडे उद्योग समूह उत्सुक असतात. मेगा प्रकल्प आणणे, सेन्ट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (सीपीआरई )ची उभारणी, प्रदर्शन केंद्र उभारणी, ड्रायपोर्टला चालना देणे आणि डिफेन्स हब निर्माण ही ‘निमा’ची पंचसूत्री अनेक समूहांना भावली आहे. यामधील तीन प्रकल्प निर्मांच्या उंबरठ्यावर आहेत. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉररूमच्या संपर्कात आहोत. नाशिकमध्ये अजून मोठ्या समूहांच्या गुंतवणूक येणार असल्याचे तिकडून संकेत आहेत. नव्या उद्योगांचे स्वागत आहे.

  • आशिष नहार, अध्यक्ष ‘निमा’, नाशिक

@ मुळात नाशिकमध्ये उद्योग येत नाही, ही ओरड अव्यवहार्य वाटते. कोणत्याही उद्योग समूहाने प्रकल्प उभारणीची घोषणा केल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनास काही वर्षांचा अवधी लागतो. एबीबी, रिलायन्स लाइफस्टाइल ही त्यापैकीच काही उदाहरणे होत. नाशिकमधील कृषी निर्यातीचा आलेख गेल्या काही वर्षांत कमालीचा वाढला आहे. केवळ अभियांत्रिकी संबंधित उद्योग येणे म्हणजे विकास नाही. इतर उद्योगदेखील विकासाचे नवे आयाम करतात. त्यासाठी संयम ठेवायला हवा. नाशिकचे महत्व कळणाऱ्या उद्योग समूहांची पावले इकडे वळण्यास आता प्रारंभ झाला असून भविष्यात त्यामध्ये सातत्य राहील, यामध्ये शंका नाही.

  • प्रदीप पेशकार, प्रदेश प्रभारी, भाजप उद्योग आघाडी, नाशिक

Comments are closed.