NGN News
Latest Marathi News

नाशिकच्या उद्योग विश्वाला ग्राफाईट इंडिया, वर्च्युओसो ऑप्टोचा साज

  • नाशिक जिल्ह्यात साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
  • इगतपुरी, दिंडोरीत साकारणार प्रकल्प
  • सहा हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूक ओघ नाशिकमध्ये यावा, यासाठी उमटलेले सूर पाहता राज्य सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने ग्राफाईट इंडिया कंपनी आणि वर्च्युओसो ऑप्टो इलेक्ट्रोनिक्स या समूहांची नाशकात अनुक्रमे ४,७६१ आणि ८०० कोटींची शहरात गुंतवणूक होणार आहे. यामुळे नाशिकच्या उद्योग वर्तुळात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित कंपन्यांनी राज्य शासनासोबत तशा आशयाचा करार केला आहे.

ग्राफाईट इंडियाने अत्याधुनिक लिथियम आयन बॅटरी उत्पादने तर ऑप्टो इलेक्ट्रोनिक्सने इलेक्ट्रोनिक्स कंट्रोलर्स, एअर कंडिशनर्स, वॉशिंग मशीन्स या उत्पादनांसाठी गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही समूहांची एकत्रित गुंतवणूक साडेपाच हजार कोटींच्या घरात असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात येऊ घातलेल्या विविध प्रकल्पांतील एकूण ३४ हजार कोटींचे सतरा करार करण्यात आले. याअंतर्गत नाशिकमध्ये दोन तर नंदुरबारमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. ग्राफाईट इंडियाचा प्रकल्प इगतपुरी तालुक्यांत आकार घेण्याची शक्यता आहे. यामधून एक हजारपेक्षा अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे वर्च्युओसो ऑप्टो इलेक्ट्रोनिक्स कंपनीसोबत करार करताना इलेक्ट्रोनिक्स उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण अधोरेखित झाले आहे. तब्बल ८०० कोटींच्या गुंतवणुकीतून हा प्रकल्प दिंडोरी औद्योगिक क्षेत्रात उभारला जाणार आहे. या प्रकल्पातून अंदाजे पाच हजार रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे.

उद्योग वर्तुळ समाधानी ..

अलीकडे वाहन उद्योग क्षेत्रातील महिंद्र समूहाने इगतपुरीत ३५० एकर क्षेत्रात विस्तारित प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. पाठोपाठ एपिरॉक समूहाने देखील इगतपुरीजवळ ३५० कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पाचे भूमिपूजन केले. त्यानंतर राज्य शासनाच्या या करारामुळे इगतपुरी आणि दिंडोरीत या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक येणार असल्याने नाशिकच्या उद्योग वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.