NGN News
Latest Marathi News

कॉंग्रेसजनांनो, निर्णायकी व्हायचे तर ‘निर्नायकी’ असून चालणार नाही ! ( प्रासंगिक )

एनजीएन न्यूज नेटवर्क

कोणत्याही निवडणुका आल्यात की अवघ्या राजकीय पक्षांचे बाहू फुरफुरतात. मग स्वबळाचा अंदाज न घेता पतंगबाजी करून लक्ष वेधून घेण्याचे कार्य पक्षाचे शिलेदार वकुबीने पार पाडतात. निवडणूक राजकारणात आणि जागांच्या तडजोडीत ‘बार्गेनिंग पावर’ वाढवायची तर अशी पतंगबाजी करण्याची राजकारणात परंपरा आहेच; मग नाशिकच्या कॉंग्रेसजनांचे चुकले म्हणायचे तरी कसे ?

आता तब्बल आठ वर्षांनी महापालिका निवडणुकीचा शंखनाद झाला आणि नाशिकच्या महात्मा गांधी रस्त्यावरील कॉंगेस भवन आशा-आकांक्षांच्या धुमा-यांनी फुलले तर काय बिघडले? या पक्षाच्या बैठकीत स्थानिकांनी ‘है तय्यार हम’ म्हणत एकप्रकारे ‘मविआ’ या राजकीय व्यवस्थेला आव्हान दिले आहे. तिकडे उद्धव ठाकरे हे बंधू राज यांच्यासोबत ‘तुझ्या गळा..’ म्हणत पवार साहेबांच्या एनसीपी आणि सपकाळे यांच्या कॉंग्रेसला वाकुल्या दाखवताना दृष्टीस पडताहेत. कॉंग्रेसजन किमान राष्ट्रपुरुषांच्या जयंती-पुण्यतिथींना कार्यालयात पायधूळ झटकताना दिसतात. मात्र, पवार साहेबांच्या पक्षाचे काय चाललेय ते स्थानिक कारभारीच जाणोत. स्थानिक ठाकरेसेना राज यांच्या पक्षाला ‘मनसे’ जवळ करून जणू युती झालीच, अशा अविर्भावात वावरताना दिसतेय. मग देशातील सर्वात जुन्या पक्षाने, त्यांच्या दाव्याप्रमाणे उद्याच्या निवडणुकीत ‘निर्णायक’ ( म्हणजे सत्ता स्थापनेत महत्वपूर्ण भूमिकेत येण्या इतपत ) जागा मिळवण्याची अभिलाषा ठेवणे उचितच नाही का ?

ही राजकीयदृष्ट्या सोयीची भूमिका असली तरी निवडणूक लढून त्या जिंकायला ज्या घटकांची गरज असते, त्याचा विचार पक्षातील दावे-प्रतिदावे करणाऱ्यांनी केला का, हा यक्षप्रश्न आहे. पक्षाकडे म्हणे ८० इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले. हा आकडा तरी किमान उत्साहवर्धक आहे. स्वबळच अजमावायचे तर नाशिकमध्ये महापालिकेच्या उण्यापुऱ्या १२२ जागा आहेत. कितीदा ‘आघाडी’त धाकट्या भावाच्या भूमिकेत जावून फरफट करून घ्यायची, असा विचार काँग्रेसजनांच्या मनात डोकावला असणार. पण निवडणूक जिंकायची तर त्यासाठी आधी सक्षम, ‘इलेक्टीव मेरीट’ असलेले उमेदवार लागतात, ही प्रधानस्थानाची गोष्ट आणि जनाधार ही त्याहून अत्यंत महत्वाची बाब. नाशिककरांच्या मनाचा ठाव घेणे सोपे नाही. १९९२ ते २०१७ चा प्रवास नजरेखालून घातला तर कॉंग्रेस-अपक्ष-शिवसेना-मनसे-भाजप.. असा चढ-उतार राजकारण्यांनी अनुभवला तो सजग मतदारराजामुळे. आता एक वर्तुळ पूर्ण करून ‘पुनश्चः हरिओम’ करायचा आणि निर्णायकी स्थितीत यायचे तर ‘निर्नायकी’ असून चालणार नाही. त्यासाठी च जनतेला भरोसा देणारा नेता शोधून ‘स्वयंसिद्धते’च्या कसोटीवर कस लावण्याचे महतआव्हान काँग्रेसजनांना स्वीकारावे लागेल इतकेच !

  • मिलिंद सजगुरे

Comments are closed.