आ. रोहित पवार यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यावर आक्षेप
दिंडोरी : एनजीएन न्यूज नेटवर्क
विधान परिषदेत तुमच्या मागे बसलेल्या पक्षाच्याच सहकाऱ्याने व्हिडीओ काढून मंत्री माणिकराव कोकाटे यांना अडचणीत आणल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याने सत्ताधारी महायुतीत नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. दिंडोरीतील खेडगाव येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या सुळे यांनी, ‘हम नंबर से कम है, फिर भी इमानदार है’, अशी टोलेबाजी देखील केली.
विधान परिषदेत रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर काहूर उठले आणि माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद गेले. त्यानंतर त्यांना क्रीडामंत्रिपद सोपवण्यात आले. सदर व्हिडीओ माध्यमांत व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी कोकाटे यांनी आ. रोहित पवार यांना अब्रू नुकसानीची नोटीस धाडली आहे. त्यावर भाष्य करताना खा. सुळे यांनी दिंडोरीत उपरोक्त दावा केला. त्या म्हणाल्या, कोकाटे यांचा कार्यक्रम आमच्या नव्हे तर त्यांच्याच माणसाने केला. तरीही अब्रू नुकसानीची नोटीस रोहितला पाठवली गेली. हा प्रकार आश्चर्यकारक आहे. आम्ही अशा प्रवृत्तीना घाबरत नसून लढत राहू, असा इशारा त्यांनी सत्ताधारी शक्तींना दिला. दरम्यान, खा. सुळे यांच्या गौप्यस्फोटानंतर मंत्री कोकाटे यांना अडचणीत आणणारा सत्ता पक्षातील कोण, यावर आता चर्चा सुरु झाली असून या मुद्द्यामुळे महायुतीत नवा वाद सुरु होण्याची चिन्हे आहेत.
माझी कामे दिल्लीतून होतात..
यावेळी बोलताना खा. सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला मागूनही वेळ देत नसल्याचा आरोप केला. तथापि, मी माझी कामे दिल्लीतून करून आणते, असा टोला लगावताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले.
Comments are closed.