महापालिका प्रारूप प्रभागरचनेला हिरवा कंदील
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
बहुप्रतिक्षित नाशिक महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेला शुक्रवारी (दि. 22) रात्री निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला. २०११ च्या लोकसंख्येचा आधार, १२२ सदस्य संख्या, चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणि प्रभागरचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल यामध्ये झालेला नाही. परिणामी, २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना ‘जैसे थे’ राहण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
जाहीर प्रभागरचनेनुसार चार सदस्यीय प्रभाग पद्धत, तसेच प्रभागरचना उत्तरेपासून तयार करण्याचे नियम कायम असल्याने नाशिक महापालिकेतील मखमलाबाद परिसर यंदाही प्रभाग क्रमांक एक ठरला आहे. चार सदस्यीय २९ प्रभाग अस्तित्वात आले असून, गत प्रभागरचनेनुसार यंदाही प्रभाग क्रमांक १५ आणि १९ हे दोन प्रभाग तीन सदस्यीय प्रभाग म्हणून अस्तित्वात आले आहेत. प्रभागरचना करताना लोकसंख्येच्या प्रगणक गटांची जुळवणी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभागाची लोकसंख्या निश्चित करण्यात आली असून यामध्ये सरासरी ४८ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग अस्तित्वात आला आहे. या प्रभागरचनेवर दि. चार सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहे. प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा आणि माहिती महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.
Comments are closed.