NGN News
Latest Marathi News

ओझर विमानतळाला यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्या : खा. वाजे

नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क

ओझर विमानतळाला यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्या, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे केली. नवी दिल्लीत सोमवारी (दि.४) सविस्तर भेट घेऊन विमानतळाच्या सर्वांगीण विकासासह हवाई संपर्क विस्ताराच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांवरही त्यांनी सकारात्मक चर्चा केली. आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रदीर्घ बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ची स्थापना करून यशवंतराव चव्हाण यांनी या भागाला औद्योगिक, संरक्षण आणि हवाई दृष्टीने सक्षम केले, याची आठवण त्यांनी मंत्री महोदयांना करून दिली. बैठकीत नाशिक-दिल्ली दररोजची थांबवलेली फ्लाइट सेवा पुन्हा सुरू करणे, ओझर विमानतळाचा टर्मिनल विस्तार, नव्या धावपट्टीचे काम, कुंभमेळ्याच्या तयारीसाठी हेलिपॅड्सची गरज, आणि नव्या हवाई मार्गांची मागणी अशा विविध बाबी मंत्र्यांसमोर ठामपणे मांडण्यात आल्या. सध्या आठवड्यात फक्त तीनच दिवस सुरु असलेल्या दिल्ली-नाशिक फ्लाइटमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही सेवा पूर्वीप्रमाणे दररोज सुरू झाल्यास, नाशिकच्या व्यापारी, वैद्यकीय, शैक्षणिक आणि धार्मिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे वाजे यांनी स्पष्ट केले.

त्र्यंबकेश्वर, नाशिक, ओझरला स्वतंत्र हेलिपॅड्स हवेत

ओझर विमानतळावर एकाचवेळी १००० प्रवाशांची क्षमता असणारा नविन टर्मिनल उभारणे, टॅक्सी वे व नविन विमानतळ अप्रोच विकसित करणे, तसेच अधिक विमानतळ पार्किंग स्पेसची निर्मिती करणे या सगळ्या प्रस्तावांना केंद्र सरकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासोबतच, त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर आणि ओझर येथे स्वतंत्र हेलिपॅड्सची उभारणी केली जावी, अशी विनंतीही त्यांनी केली. कुंभमेळ्याच्या वेळी अतिविशाल भाविक संख्येचा विचार करता, ही यंत्रणा आपत्कालीन व प्रशासकीय कारणांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

या बैठकीत मंत्री श्री. राममोहन नायडू यांनी अनेक मुद्द्यांवर सकारात्मकता दर्शवून प्रस्तावांचा सखोल विचार करण्याचे आश्वासन दिले. केंद्र आणि राज्य सरकार तसेच HAL व इतर संबधित संस्थांमध्ये समन्वय साधून प्रस्तावित प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यावर दोघांनी एकमत दर्शवले.

Comments are closed.