NGN News
Latest Marathi News

वाचन संस्कृतीचा जागर ! १५ दुर्गम गावांमध्ये वाचनालये सुरू होणार

  • एसएनएफ वाचनालय चळवळीला एपिरॉक मायनिंग इंडियाची मोठी मदत
  • नाशिक/ पुण्यातील गावांत होणार वाचन संस्कृतीचा जागर

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सोशल नेटवर्किंग फोरम (SNF) संस्थेच्या वाचनालय चळवळीला जागतिक ख्यातीच्या एपिरॉक मायनिंग इंडिया प्रा. लि. या कंपनीने ४० लाखांची सीएसआर मदत मंजूर केली आहे. या मदतीचा औपचारिक सामंजस्य करार एपिरॉकच्या जनरल मॅनेजर कथरीना कोलकिंग यांनी SNF चे संस्थापक प्रमोद गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला.

या प्रसंगी कंपनीचे सीएसआर प्रमुख धनाजी पुरी, HR व्यवस्थापक पल्लवी पांडे तसेच अन्य अधिकारी विनायक चंद्रात्रे आणि प्रियांका वाणी उपस्थित होते. एपिरॉक ही स्वीडनमधील बहुराष्ट्रीय कंपनी असून खाणकाम व पायाभूत सुविधांसाठी आधुनिक व सुरक्षित उपकरणांचे उत्पादन करते. भारतामध्ये पुणे येथे मुख्यालय असून नाशिक व हैदराबाद येथे उत्पादन केंद्रे आहेत. बेंगळुरूमध्ये एपिरॉक इंजिनिअरिंग, इनोव्हेशन व टेक्निकल सेंटर आहे. तसेच भारतभर ८ प्रादेशिक केंद्रे आहेत. यासोबतच एपिरॉक भारतातील वाचनचित घटकांच्या शाश्वत विकासात सातत्याने योगदान देत आहे.

मागील वर्षी, SNFच्या दुर्गम वाचनालय चळवळीबाबत माहिती मिळाल्यानंतर, कंपनीने संस्थेकडून प्रस्ताव मागवला होता. SNF ने नाशिक व पुणे जिल्ह्यातील १५ गावांमध्ये वाचनालये स्थापन करण्यासाठी ४० लाखांचा प्रस्ताव सादर केला, जो अलीकडे मंजूर झाला आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील ५ दुर्गम गावांमध्ये लवकरच वाचनालये सुरू केली जातील. दुसऱ्या टप्प्यात, पुणे जिल्ह्यातील ५ व नाशिकमधील आणखी ५ गावांमध्ये वाचनालये उभी केली जातील. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढवणे आणि तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य साधनसामग्री उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.

————————-
दुर्गम भागातील तरुणांना वाचन, अभ्यास आणि त्यातून रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी SNF मोलाची भूमिका बजावत आहे. Epiroc च्या ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत आम्ही यात गाव विकासासाठी सहकार्य करत आहोत.”

  • धनाजी पुरी, सीएसआर प्रमुख, एपिरॉक

एपिरॉकच्या दानशूरतेमुळे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचे किरण पेरले जातील.”

  • प्रमोद गायकवाड, संस्थापक, SNF

Comments are closed.