NGN News
Latest Marathi News

सर्वात्मक वाचनालयास डॉ. आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

पुरस्कार वितरण सोहळा पुढील महिन्यात मुंबई येथे होणार


इंदिरानगर : एनजीएन न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृद्धिगत होण्यासाठी, राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे योगदान लाभावे यासाठी, ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयाकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार दिला जातो. शासनाने 2023 /2024 या सालासाठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले असून त्यामध्ये नाशिकमधील इंदिरानगर येथील सर्वात्मक वाचनालय व कलादालन या संस्थेला ” ब” वर्गातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये 75,000/- हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात येईल. हा पुरस्कार वितरण सोहळा पुढील महिन्यात मुंबई येथे होणार आहे.

इंदिरानगर मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेले व आदरणीय दुर्गा भागवत यांनी नामकरण केलेले हे सर्वात्मक वाचनालय एक 1995 पासून वाचन संस्कृती समृद्ध करण्याचे काम करीत आहे. गेल्या 30 वर्षापासून वाचनालयाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. 25000 पर्यंत ग्रंथसंपदा, 975 वाचक सभासद, सर्व कामकाज संगणकाद्वारे, 130 दिवाळी अंक, मासिके, पाक्षिके व 15 वर्तमानपत्र वाचकांना उपलब्ध करून दिले जातात.

वाचनालयातर्फे विविध उपक्रम राबवून विद्यार्थी पालक व कलेचे रसिक यांना प्रोत्साहित केले जाते. त्यासाठी शास्त्रीय गायन, चित्रकला प्रदर्शने, ग्रंथ प्रदर्शने, इंदिरानगर मधील विद्यार्थ्यांना क्षेत्रभेट म्हणून वाचनालयात शाळा भेट देतात, उत्कृष्ट वाचक सभासद यांचा सन्मान केला जातो. राष्ट्रीय कार्यक्रम जयंती पुण्यतिथी याव्यतिरिक्त व्याख्यानमाला असे विविध उपक्रम राबविले जातात.

———————————

@ इंदिरानगरमधील नव्हे तर नाशिक परिसरात हे वाचनालय आता ओळखीचे झालेले आहे. महाराष्ट्र शासनाचा या राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने वाचनालयाच्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या सर्वांचे वाचक वर्गातून अभिनंदन व कौतुक होत आहे केलेल्या कार्याची चांगली पावती शासनातर्फे मिळाल्याने यापुढे अधिक जबाबदारी वाढली आहे.

  • श्री विलास टिळे, अध्यक्ष, सर्वात्मक वाचनालय व कलादालन, नाशिक

Comments are closed.