- नाशिकरोड ते द्वारका उड्डाणपूल, रिंगरोडसाठी तगादा
नाशिक / नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क
खासदार राजाभाऊ वाजे यांनी गुरुवारी (दि.२४जुलै) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन नाशिकमधील विविध महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकमध्ये सुरू असलेली व प्रस्तावित असलेली विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याची जाणीव त्यांनी गडकरी यांना करून दिली. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने शहराच्या रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल व वाहतूक व्यवस्थापन यामध्ये दर्जात्मक बदल होणे हे केवळ गरजेचे नाही, तर अनिवार्य असल्याचे खासदार वाजे यांनी स्पष्टपणे मांडले.
बैठकीदरम्यान, खासदार वाजे यांनी नाशिकरोड ते द्वारका उड्डाणपूल प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा दिवसेंदिवस वाढता प्रश्न लक्षात घेता हा पूल तातडीने पूर्ण होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. तसेच, नाशिकसाठी प्रस्तावित असलेला उन्नत रिंग रोड हा केवळ शहराच्या परिघावरील वाहतूक विस्कळीत होण्यापासून थांबवणार नाही, तर शहराचा बहुआयामी विकासही गतीमान करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंहस्थ काळात होणारी अफाट गर्दी आणि त्यातून उद्भवणाऱ्या वाहतूक व आपत्कालीन व्यवस्थापनाच्या गरजा लक्षात घेता, हा रिंग रोड नाशिकसाठी जीवनरेषा ठरू शकतो, असे ते म्हणाले.
या चर्चेत नाशिक-पुणे औद्योगिक महामार्ग आणि नाशिक-मुंबई महामार्ग यांच्याही दुरुस्ती, आधुनिकीकरण व विस्ताराच्या विषयांवर चर्चा झाली. विशेषतः औद्योगिक महामार्गामुळे नाशिक आणि पुण्याच्या दरम्यानचा प्रवास वेळ वाचवणारा आणि सुरक्षित ठरणार असून, या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांतील औद्योगिक व व्यापारिक व्यवहारांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, नाशिक-मुंबई महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे दोन महत्त्वाच्या शहरे अधिक वेगाने व सुरक्षित पद्धतीने जोडली जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खासदार वाजे यांनी गडकरी यांच्याकडे या सर्व प्रकल्पांना तातडीने मंजुरी, निधी वितरण व कामाला गती देण्यासाठी विशेष लक्ष देण्याची विनंती केली. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित विभागांमार्फत तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू होईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
या भेटीमुळे नाशिकच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, आगामी काळात त्यांना आवश्यक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
—————————–
“नाशिकच्या विकासासाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी ही कामे वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे. कुंभमेळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, एक व्यापक शहरी व नागरी व्यवस्थापनाची कसोटी असते. त्यामुळे केंद्र सरकारचे सहकार्य मिळवून नाशिकला राष्ट्रीय स्तरावर दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. सातत्याने केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे कामांचा तगादा सुरूच आहे. या भेटीत प्रकल्प कुंभमेळा पूर्वी पूर्णत्वास येण्यासाठी किती गती द्यावी लागेल याची देखील जाणीव करून दिली आहे.”
- : राजाभाऊ वाजे, खासदार
या विषयांवर झाली चर्चा
- नाशिकरोड ते द्वारका उड्डाण पूल: शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल अत्यंत गरजेचा असून, त्याच्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली.
- नाशिक रिंग रोड प्रकल्प: नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कुंभमेळ्यातील भाविकांच्या सोयीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत होणार असून, शहरे व औद्योगिक भाग यांना चांगले कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
- नाशिक-पुणे औद्योगिक महामार्ग: औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या या महामार्गाच्या अंमलबजावणीसाठी विशेष लक्ष देण्याची विनंती गडकरींना करण्यात आली.
- नाशिक-मुंबई महामार्गाचे आधुनिकीकरण: वाढत्या प्रवासी व वाहतूक दाबाला तोंड देण्यासाठी या महामार्गावर अत्याधुनिक सुधारणा आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
नाशिकरोड ते द्वारका कुंभपूर्वी शक्य आहे का?
नाशिकरोड ते द्वारका हे किमान ६.५ किमी अंतर आहे. एवढा मोठा उड्डाणपूल उभारणीसाठी किमान २ ते कमाल ४ वर्षाचा कार्यकाळ लागू शकतो असे तज्ञाचे मत आहे. त्यामुळे मंजुरी मिळून कामाला सुरुवात व्हायला सुद्धा किमान ४ ते ६ महिन्याचा वेळ लागू शकतो. त्यामुळे कुंभपूर्वी हा उड्डाणपूल पूर्ण होणे अशक्य आहे. कुंभमेळा काळात जर काम सुरू असेल तर ते अधिक अडचणीचे ठरेल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या नागपूर येथे झालेल्या बैठकीत या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाबाबत कुंभमेळ्याच्या नंतर गर्भिर्याने घेतले जाण्याचा सूर बघायला मिळाला. केंद्र व राज्य सरकारची भूमिका बघता हा प्रकल्प बासनात गुंडाळण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, असे होऊ नये याकरता काम जरी कुंभमेळ्याच्या नंतर सुरू केले तरी चालेल मात्र किमान प्रकल्पाला सर्व प्रकारच्या मंजुऱ्या, तांत्रिक आणि कागदपत्री कामे आत्ताच पूर्व व्हावे या दृष्टिकोनातून खासदार राजाभाऊ वाजे यांनी पाऊले टाकायला सुरवात केली आहे.
Comments are closed.