NGN News
Latest Marathi News

दत्ताजी पाटील बँकेचा राष्ट्रीय स्तरावर डंका ! एकाच मंचावर तीन पुरस्कारांचा साज

लासलगाव : राकेश बोरा

“इन्फोमेडीया” आणि “नेफकब” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय अर्बन कॉऑपरेटिव्ह बँकिंग समिट आणि पुरस्कार २०२५’ या भव्य सोहळ्यात लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेला देशपातळीवरील तीन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

बँकेला “सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक”, “सर्वोत्कृष्ट थकबाकी वसुली व्यवस्थापन बँक” आणि “सर्वोत्कृष्ट गुंतवणूक/कोषागार व्यवस्थापन बँक” या तीन प्रमुख पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

देशभरातील शेकडो बँकांच्या निवडीमधून ही निवड झाल्याने दत्ताजी पाटील बँकेचे कार्यक्षेत्र, आर्थिक कारभार आणि व्यवस्थापन कौशल्य यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. पुण्यातील हॉटेल कॉनराड येथे पार पडलेल्या या सोहळ्यात बँकेचे मार्गदर्शक शंतनु पाटील यांनी बँकेतर्फे पुरस्कार स्वीकारले.

याच परिषदेत शंतनु पाटील यांना “डिजिटाईझेशन, तंत्रज्ञान व सायबर सुरक्षितता” या महत्त्वाच्या विषयावर तज्ज्ञ वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहकारी बँकिंग क्षेत्रातील नव्या युगातील आव्हाने आणि संधी यावर प्रकाश टाकला.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना बँकेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील म्हणाले, लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक ही परिसरातील एक विश्वासार्ह, सक्षम आणि पारदर्शक कार्यपद्धती असलेली बँक आहे. देशपातळीवर सलग चौथ्यांदा पुरस्कार मिळणे हे आमच्या सर्व बँक कर्मचाऱ्यांचे, संचालक मंडळाचे आणि खातेदारांचे सामूहिक यश आहे. २०२५ हे ‘आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष’ म्हणून साजरे होत असताना, हे गौरव आमच्यासाठी विशेष अभिमानास्पद आहेत.”

या पुरस्कारामुळे बँकेच्या सामाजिक आणि आर्थिक योगदानाला नवी ओळख मिळाली असून, सहकार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला आहे.

Comments are closed.