देवळा : पंडित पाठक
शहरातील पाचकंदील येथे आज सकाळी शेतकरी व कामगार संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी दोन तासांचे शांततेत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी, कामगार व महिलांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
या आंदोलनामागे कांद्याचे दिवसेंदिवस घसरते दर, नाफेड-एनसीसीएफकडून पडद्यामागे सुरू असलेली बोगस खरेदी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे अपयश, कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानाही शासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, चाळीत सडणारा कांदा, अपंगांना मानधन, वसाकाचा बंदप्रश्न, कामगारांचे हाल, तसेच शेणखतास सबसिडी मिळावी यांसारख्या प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी सांगितले की, “शेतकरी आज मेटाकुटीला आला आहे. त्याचा कांदा सडत असताना, सरकार रमीखेळात मग्न आहे. शेतकऱ्याच्या परिस्थितीकडे सरकार डोळेझाक करत आहे. आता कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान ₹३,००० प्रति क्विंटल दर मिळालाच पाहिजे. कांद्याचे दर २५ रुपये किलोपेक्षा कमी होणार नाहीत यासाठी सरकारने ठोस धोरण निश्चित करावे. तसेच कांदा जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून त्वरित वगळावा.”
प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिसिंग ठोके यांनी सांगितले की, “कोणतेही सरकार कांद्याच्या दरात हस्तक्षेप करू नये, यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी पूर्वीच धोरण आखले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र आले पाहिजे.”
चक्काजाम आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन शांततेत पार पडले. शेवटी सकाळी ११ वाजता प्रहार व स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून पोलीस व प्रशासनाच्या हस्तक्षेपाने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी ना. तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात प्रहार शेतकरी संघटनेचे हरिसिंग ठोके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, कृष्णा जाधव, माणिक निकम, फुला जाधव, गणेश शेवाळे, रविंद्र शेवाळे, अशोक शेवाळे, बंडू आढाव, भाऊसाहेब मोरे, सुभाष पवार, विकास देवरे, रत्नाकर देवरे, शिवाजी अहिरे, विनोद आहेर, शरद आहेर, महेंद्र आहेर, पी.डी. निकम, संजय सावळे, कैलास कोकरे, निंबा निकम, समाधान निकम, शशिकांत पवार, तुकाराम बोरसे, धनंजय बोरसे, दादाजी शेवाळे, हेमंत निकम, शरद सोनवणे, आबा निकम, खंडू खैरनार, बाळासाहेब पगार अण्णा शिवाजी, विठोबा मेधने, नाना पवार यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
Comments are closed.