
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : प्रस्तावित सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोदाकाठावर विविध विकास कामे सुरू आहेत. याच अंतर्गत लक्ष्मण झुलाचे काम गोदाकाठी सुरू असून यासाठी येथील अनेक बांधकामे पाडण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतला आहे. याच निर्णया अंतर्गत गोदाकाठी सुमारे 20 वर्षांपासून सुरू असलेले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पाडण्याची नोटीस आल्याने हजारो श्री स्वामी समर्थ महिला पुरुष सेवेकऱ्यांमध्ये संतापाची लाट आली असून आज मंगळवारी सुमारे 900 सेवेकऱ्यांनी गोदाकाठच्या केंद्रात ठिय्या मांडून आध्यात्मिक सेवा रुजू करून नाशिक महानगरपालिकेच्या या निर्णयाचा निषेध अनोख्या पद्धतीने व्यक्त केला.
वीस वर्षांपूर्वी नाशिक महानगरपालिकेतील तेव्हाचे नगरसेवक, महापौर, उपमहापौर स्थायीसमिती अध्यक्ष व सदस्य आणि आयुक्त यांच्या परवानगीने व आवश्यक त्या ठरावानुसार गोदाकाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू झाले आणि या केंद्राच्या माध्यमातून बाल संस्कारासह वेगवेगळे उपक्रम उदाहरणार्थ सप्ताह,पारायण, प्रकट दिन व इतर धार्मिक कार्यक्रम नेहमीच सुरू असतात. सेवा मार्गाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या सुमारे गेल्या तीन वर्षापासूनच्या स्वच्छता अभियानात या केंद्राची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.याच केंद्रातून श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे देशभर चालणारे स्वच्छता अभियान व आरोग्य अभियान सुरू झाले.त्यामुळे स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या दृष्टीने या केंद्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.सेवेकऱ्यांच्या वतीने होणारे दरवर्षीचे गंगापूजन आणि इतर कार्यक्रम या गोदाकाच्या केंद्राच्या माध्यमातूनच होत असतात म्हणून सेवेकऱ्यांची या केंद्राशी भावनिक, आध्यात्मिक नाळ जुळली असून रोज येथे आरतीसाठी सुमारे दोन-तीनशे सेवेकरी उपस्थित असतात आणि स्वच्छता अभियानाच्या प्रसंगी येथील हजारो सेवेकरी या उपक्रमात सहभागी होत असतात.
हे केंद्र वाचविण्यासाठी शेकडो सेवेकरांच्या वतीने पुढाकार घेणारे येथील ज्येष्ठ सेवेकरी योगेश शिरापुरे म्हणाले की, “लक्ष्मण झुलाचे काम हे केंद्र न पाडता किंवा न स्थलांतरित करता ही करता येऊ शकते म्हणून नाशिक महानगरपालिका व कुंभमेळा प्रशासनाने याबाबतीत सहानुभूतीने विचार करून हे केंद्र आहे तसे ठेवून लक्ष्मण झुलाचे काम करावे यासाठी आमच्याकडून कोणतीच अडचण नाही “
काल सेवेकर्यांपर्यंत हे केंद्र पाडण्यात येणार असा निरोप पोहोचताच नाशिकसह जिल्ह्यातील सेवेकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि जिल्हाभरातील सेवेकरी आज सकाळी सात वाजल्यापासून केंद्राच्या परिसरात जमा झाले. सेवेकर्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे भूपाळी आरती केली आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप व इतर अध्यात्मिक सेवा रुजू करण्यास सुरुवात केली. निरोप व मिळताच आमदार देवयानी फरांदे यांच्या वतीने निखिल पवार, सोनाली पवार तसेच विनायक पांडे, ऋतुराज पांडे, अदिती पांडे, अंकुश पवार, मयुरी पवार, बबलू शेलार,शाहू खैरे अशा सर्व मान्यवरांनी केंद्र परिसरात धाव घेतली आणि हे केंद्र कुठल्याही परिस्थितीत पडणार नाही याची ग्वाही उपस्थित महिला पुरुष सेवेकऱ्यांना दिली.
Comments are closed.