
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना भटके विमुक्त समाजाचा कार्यगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. राज्यभर कार्यरत असणाऱ्या भटका विमुक्त शोषित समुदाय संघर्ष संघटनेतर्फे या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
पुणे येथे साने गुरुजी स्मारक येथे झालेल्या समारंभात नाशिक – त्र्यंबकेश्वर कुंभमेळाचे अतिरिक्त आयुक्त प्रमोद कुमार पवार, नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू अशोक महाजन यांच्या हस्ते चांदगुडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जातपंचायतींच्या मनमानीविरोधातील केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. कृष्णा चांदगुडे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह आहे. जातपंचायतचे प्रस्थ बहुतांश जातीत असले तरी भटके विमुक्त समाजात त्याचे क्रौर्य व अघोरी शिक्षा भयानक आहे.२०१३ साली नाशिक येथे आंतरजातीय विवाह केल्यामुळे भटके विमुक्त समाजातील एका गर्भवती महिलेचा तिच्या पित्याने निर्घृण खून केला होता. याच्या पाठीमागे जातपंचायतीचा दबाव आहे, हे चांदगुडे यांनी कार्यकर्त्यांसोबत शोधून काढले होते . त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दूरदृष्टीतून नाशिक येथून जातपंचायत मुठमाती अभियान सुरू झाले. पुढे ते राज्यभर पोहचले.
जातपंचायतीच्या विरोधातील लढ्यामुळे २०१६ ला राज्य सरकारने ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ संमत केला. त्यात चांदगुडे यांचा प्रमुख सहभाग राहिला आहे .चांदगुडे यांच्या प्रयत्नाने भटके विमुक्त समाजातील १९ जातपंचायती बरखास्त करण्यात आल्या आहे. महाराष्ट्रातील सामाजिक इतिहासात हे महत्त्वाचे पाऊल बोलले जाते. आता उघडपणे जातपंचायती बसणे बंद झाले आहे. संविधानाला कमकुवत करणारे न्यायदान व अघोरी शिक्षा करणे बंद झाले आहे.भटके विमुक्त समाजातील अनेक अंधश्रद्धा व कुप्रथा थांबवण्यात त्यांना यश आले आहे.
त्यांच्या या कार्यामुळे भटके विमुक्त समाजातील शेकडो पीडितांना पुन्हा सन्मानाचे जीवन लाभले आहे. चांदगुडे यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रा. शिवाजी जोशी , लेखक नारायण भोसले , एडवोकेट अरुण जाधव हे यावेळी उपस्थित होते. या पुरस्कारामुळे अंनिस कार्यकर्ते व हितचिंतकांनी चांदगुडे यांचे अभिनंदन केले आहे.
Comments are closed.