NGN News
Latest Marathi News

नदीत बाप्पाचे विसर्जन थांबवा : क्रिएटिव्ह कुटीरचे आवाहन

  • पीओपी मूर्तींमुळे जलप्रदूषणाचा धोका; नद्यांचा ऱ्हास आता थांबवणे काळाची गरज

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : गणेशोत्सवानंतर नदीपात्रात मूर्ती विसर्जित केल्याने नद्यांच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनवलेल्या मूर्ती पाण्यात वर्षानुवर्षे विरघळत नसल्याने जलप्रदूषणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढे कोणत्याही परिस्थितीत नदीत मूर्ती विसर्जन करू नये,असे सक्त आवाहन क्रिएटिव्ह कुटीर या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि भक्तीभावात आपण बाप्पाला निरोप देतो, मात्र विसर्जनानंतरचे नदीकाठचे वास्तव मन सुन्न करणारे असते.अनेक ठिकाणी नदीत आणि किनाऱ्यावर पीओपीच्या मूर्ती जशाच्या तशा अवस्थेत पडून असल्याचे दिसून येते. पीओपी हे पाण्यात कधीही विरघळत नाही, हे विज्ञानाने आणि प्रशासनाने वारंवार सिद्ध केले आहे. त्यामुळे केवळ जलसृष्टीलाच धोका पोहोचत नाही, तर ज्या देवाची आपण दहा दिवस मनोभावे पूजा करतो, त्याचीच घोर विटंबना होते. भक्तीच्या नावाखाली नद्यांचा होणारा हा ऱ्हास आता थांबवणे काळाची गरज बनली आहे.


या पार्श्वभूमीवर क्रिएटिव्ह कुटीरने नागरिकांना कृत्रिम तलावांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. मूर्ती पीओपीची असो वा शाडू मातीची, तिचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात न करता केवळ प्रशासनाने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करावे. नद्यांचे पाणी पिण्या साठी आणि शेती साठी वापरले जाते, पीओपीमधील घातक रसायनांमुळे हे पाणी विषारी होत असल्याने नदीत विसर्जन करणे पूर्णपणे थांबवावे, तसेच शाडू मातीची मूर्ती असल्यास तिचे विसर्जन घरच्या घरी बादलीत किंवा हौदात करावे, असा पर्यायही संस्थेने सुचवला आहे.

पुढील वर्षीपासून केवळ शाडू मातीच्या, कागदाच्या लगद्याच्या किंवा नैसर्गिकरीत्या सहज विरघळणाऱ्या मूर्तींचीच प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा. आपल्या देवाची आणि निसर्गाची काळजी घेणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असून केवळ उद्विग्न होऊन चालणार नाही, तर कृतीतून सातत्य दाखवत बदल घडवणे आवश्यक आहे. नागरिकांनी भक्तीला पर्यावरणाच्या जाणिवेची जोड देऊन इको-फ्रेंडली उत्सव साजरा करावा, अशी स्पष्ट भूमिका क्रिएटिव्ह कुटीरच्या वतीने शितल विक्रम उगले यांनी मांडली आहे.

Comments are closed.