
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सटाणा : श्रीकांत रौंदळ
संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या “आंतरराष्ट्रीय विधवा दिन” निमित्त सटाणा नगरपरिषदेच्या वतीने ‘एकल महिला दिवस’ साजरा करण्यात आला. त्यात १०० हून अधिक एकल महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
सटाणा नगरपरिषदेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष हर्षदा राहुलबाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी उपनगराध्यक्ष सुमित विजयराज वाघ, महिला व बालविकास समितीच्या सभापती कल्पना दयाराम सोनवणे, मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील, श्री देव मामलेदार गटनेता मनिषा जयवंत पवार, नगरसेवक सुनंदा रमेश देवरे, प्रशासकीय अधिकारी विनायक विनायक खैरनार, जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस, सहायक प्रकल्प अधिकारी विजय भोई, ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात एकल महिलांना शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा योजना, आर्थिक सहाय्य योजना तसेच महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा यासाठी आवश्यक नोंदणी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेलाही प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे एकल महिलांमध्ये शासनाच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण होऊन त्यांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा हर्षदा राहुलबाबा पाटील यांनी व्यक्त केला. तसेच शासनाच्या वतीने एकल महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक करून उपस्थितांचे आभार मानले.
उपस्थित महिलांनीदेखील कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत सटाणा नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना शासनाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
सटाणा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
Comments are closed.