
- रस्ते, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक, सुरक्षा व अग्निशमन व्यवस्थेचा आढावा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सप्तशृंगगड : रघुवीर जोशी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर अश्विन नवरात्र यात्रा व कोजागिरी पौर्णिमा उत्सव येत्या ११ ते 20 ऑक्टोबर तसेच कोजागिरी पोर्णिमा दि. २५ आणि २६ ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याने प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. कायदा व सुव्यवस्था, गर्दी नियंत्रण, वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, विद्युत व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध विभागांच्या कामांचा आढावा मंगळवारी (दि. २२) घेण्यात आला.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या चिंतन सभागृहात सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण कश्मीरा शंखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुढील टप्प्यात अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याने त्यापूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नांदुरी-सप्तशृंगगड रस्ता अंतिम टप्प्यात
नांदुरी-सप्तशृंगगड रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून कॉंक्रिटीकरणानंतर आवश्यक क्युरिंगसाठी रस्ता काही दिवस बंद ठेवण्यात आला आहे. शनिवार व रविवार भाविकांसाठी रस्ता खुला ठेवण्याचे नियोजन असून हे नियोजन २६ सप्टेंबरपर्यंत असल्याची माहिती कश्मीरा शंखे यांनी दिली.
रोपवेच्या स्वच्छतेवर प्रश्न
यात्राकाळातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा बैठकीत गांभीर्याने घेण्यात आला. रोपवे प्रशासनाने वर्षभरात प्लास्टिकबंदी व स्वच्छतेसाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच CSR निधीतून गडावरील स्वच्छता व मूलभूत सुविधांसाठी कोणती कामे करता येत आहे याबाबत विचारणा करण्यात आली.
अतिक्रमण, वाहतूक अन् अग्निशमन
पावसामुळे रखडलेली अतिक्रमण हटाव कारवाई यात्रा कालावधीपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना वन विभाग व ग्रामपंचायत सप्तशृंगगड यांना देण्यात आल्या. नांदुरी-सप्तशृंगगड दरम्यान अतिरिक्त एस.टी. बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.
यात्राकाळात अरुंद रस्ते व गर्दीच्या ठिकाणी तातडीने पोहोचण्यासाठी मिनी स्वरूपातील अग्निशमन बंब कार्यान्वित ठेवावा, अशी सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी केली. गडावर प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी, धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टर व दिव्यांची व्यवस्था तसेच रस्त्यालगतच्या व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण कश्मीरा शंखे, तहसीलदार रोहिदास वारुळे, ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, सरपंच रमेश पवार, ग्रामसेवक संजय देवरे, उपसरपंच संदीप बेनके, रोपवे प्रकल्प प्रतिनिधी, ग्रामपंचायत सप्तशृंगगड व नांदुरीचे पदाधिकारी, वन विभाग, एस.टी. महामंडळ, महावितरण तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी व ग्रामात उपस्थित होते.
Comments are closed.