
- मराठमोळ्या हस्तकलेला अमेरिकन नागरिकांची पसंती; महिला सक्षमीकरणाच्या सहकार मॉडेलची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक | “छोट्या बचतीतून मोठे परिवर्तन” हा महाराष्ट्राच्या महिला बचत गट चळवळीचा संदेश आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था आणि जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या सभासद महिलांनी तयार केलेल्या आकर्षक हस्तकला वस्तू, पारंपरिक मराठमोळ्या कापडी भेटवस्तू आणि सांस्कृतिक कलाकुसरीला अमेरिकेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. अश्विनी अशोक बोरस्ते यांनी अमेरिकेतील वास्तव्यात विविध अमेरिकन नागरिक, भारतीय कुटुंबे आणि महिलांशी संवाद साधत महिला बचत गट चळवळीचा प्रवास, सहकाराची ताकद आणि महिलांच्या आर्थिक-सामाजिक सक्षमीकरणाची यशोगाथा प्रभावीपणे मांडली.
यावेळी बचत गटातील महिलांनी तयार केलेले पारंपरिक तोरण, हस्तकलेच्या आकर्षक पर्स, कापडी भेटवस्तू आणि मराठी संस्कृतीची ओळख जपणाऱ्या कलाकृती अमेरिकन कुटुंबांना भेट देण्यात आल्या. या वस्तूंची रंगसंगती, कलात्मकता आणि भारतीय संस्कृतीशी असलेले नाते पाहून अनेकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले आणि अशा उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. बोरस्ते यांनी यावेळी सांगितले,
“महिलांच्या हातातील एका रुपयाच्या बचतीतून लाखो रुपयांच्या आर्थिक स्वावलंबनाचा प्रवास घडू शकतो. बचत गट हा केवळ आर्थिक व्यवहार नसून आत्मविश्वास, स्वाभिमान, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाचा पाया आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याला योग्य प्रशिक्षण, बाजारपेठ आणि संधी मिळाल्यास त्या जागतिक स्तरावरही आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. ‘लोकल टू ग्लोबल’ ही संकल्पना महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या भेटीदरम्यान भारतीय संस्कृती, सहकाराची परंपरा, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण उद्योजकतेबाबत अमेरिकन नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. मराठी परंपरेचे प्रतीक असलेल्या हस्तकला वस्तूंना मिळालेली पसंती ही नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील दखल मानली जात आहे.
सहकार, संस्कृती आणि स्वावलंबनाचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे नाशिकच्या महिला बचत गटांना जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याची दिशा निर्माण झाली असून, महिला उद्योजिकांसाठी निर्यातीचे नवे मार्ग खुलण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.