माणिकखांब : एनजीएन न्यूज नेटवर्क
इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले.
यावेळी इगतपुरी–त्र्यंबकेश्वरचे लोकप्रिय आमदार हिरामण दादा खोसकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची विधिवत पूजा व महाआरती संपन्न झाली. चव्हाण बंधू व पाटील परिवाराच्या वतीने आमदार हिरामण दादा खोसकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महाआरतीनंतर आमदार हिरामण दादा खोसकर यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व समाजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. “इडा-पिडा जाऊ दे, बळीचे राज्य येऊ दे आणि बळीराजा सुखी राहू दे,” अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली. यानंतर उपस्थित भाविकांना फराळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. फराळामध्ये खिचडी, लाडू, चिवडा, वेफर्स व केळीचा समावेश होता. या प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
मुंबई–आग्रा महामार्गालगत दारणा नदीच्या रमणीय तीरावर वसलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित या धार्मिक सोहळ्यास माणिकखांब परिसरासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. चव्हाण बंधू, पाटील परिवार तसेच माणिकखांब ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी ॲड. एन. पी. चव्हाण, ॲड. जी. पी. चव्हाण, ॲड. दिलीप वनारसे, हभप लक्ष्मण बाबा चव्हाण, हभप बन्सी बाबा चव्हाण, माजी सरपंच हरीश चव्हाण, दीपक चव्हाण, संदीप चव्हाण, विजय चव्हाण, मदन कडू, विनायक काळे, विनायक आडोळे, वासुदेव चव्हाण, खंडू चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
Comments are closed.