NGN News
Latest Marathi News

समर्थ सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा उत्सवास गुरुपीठात प्रारंभ

  • सेवेकरी व वारकऱ्यांची मंदियाळी; पन्नास हजार सेवेकरी उपस्थित

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

“गाव तेथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि घर तेथे सेवेकरी हे अभियान राबविण्यासाठी सर्व सेवेकऱ्यांनी सक्रिय व्हावे. समर्थ कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडवायचे असेल तर प्रत्येक घरात स्वामीसेवा पोचणे गरजेचे आहे म्हणूनच निर्व्यसनी, आदर्श, सुसंस्कृत, सशक्त कुटुंब, समाज, राष्ट्र उभे करण्यासाठी आपण सर्वांनी आजपासूनच कामाला लागावे “असे आवाहन गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांनी केलं. याप्रसंगी चंद्रकांतदादा, नितीनभाऊ, आबासाहेब मोरे उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात आज आषाढी एकादशीपासून गुरुपौर्णिमा उत्सवाचा प्रारंभ झाला , या निमित्ताने गुरुपीठात एकत्रित झालेल्या हजारो सेवेकरी, वारकऱ्यांशी हितगुज साधताना गुरुमाऊलींनी वरील आवाहन केले.

बुधवारी 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे परंतू सेवामार्गाचा वाढता व्याप लक्षात घेता एकाच दिवशी देशभरातील महिला पुरुष सेवेकऱ्यांची त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी येथे गर्दी होऊन नियोजनाचा ताण यायला नको म्हणून आज आषाढी एकादशी पासून 29 जुलै पर्यंत जिल्हावार विभागणी करून रोज ठराविक संख्येने सेवेकरी दिंडोरी, त्र्यंबक मध्ये येतील अश्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे म्हणूनच आजपासून गुरुपौर्णिमा उत्सव सुरु करण्यात आला. गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, नृसिंहवाडी सह देश आणि विदेशातील समर्थ केंद्रावर होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाचे नियोजन करण्यात आले.

जुलै महिना संपत आला आपण मोठया प्रमाणात केलेल्या सेवेमुळे पर्जन्य राजाने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी भरघोस कृपा केली पण काही ठिकाणी त्याने दडी मारल्यानं चिंता व्यक्त करुन गुरुमाऊली म्हणाले की सेवेकऱ्यांनी पर्जन्य सुक्ताच्या माध्यमातून पर्जन्य राजास विनंती करीतच राहावं. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी, भाविक वारीतून आज विठ्ठल, पांडुरंग दर्शनासाठी पंढरीत हजर होत आहेत. वारीत जाण्याचं पुण्य, अनुभती मोठीच आहे पण पांडुरंगा बरोबरच पुंडलिकालाही समजून घ्यायला हवे असा मोलाचा सल्लाही गुरुमाऊली यांनी दिला.
अब्जचंडी व इतर अध्यात्मिक सेवांबरोबरच एक कोटी वृक्षारोपण, स्वच्छता आरोग्य अभियान, मराठी अस्मिता भारतीय संस्कृती, गर्भ, मूल्य, बाल, युवासंस्कार, सामुदायिक विवाह, सेंद्रिय शेती, ग्रामभियान, प्रश्नोत्तरं अश्या विविध समजपयोगी कामांचा आढावा घेऊन मार्गदर्शन गुरुमाऊलींनी केले.

आजच्या या गुरुपौर्णिमा शुभारंभ प्रसंगी इतर देशांमधूनही महिला पुरुष सेवेकरी उपस्थित होते. सकाळी श्री स्वामी समर्थ महाराज अभिषेक व महापूजा चंद्रकांत दादा मोरे यांचे हस्ते संपन्न झाले.

आज दिवसभर गुरुपीठ परिसरात सेवेकरी व वारकऱ्यांची मंदियाळी दिसून आली.दिवसभर सेवेकरी शिस्तीत, शांततेत, रांगेत येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांचेकडे आपले गुरुपद सोपवून, “तुम्हीच आमचे सर्वस्व, गुरु, बंधू,सखा, माता, पिता आहात आमचे रक्षण करा व कायम आशीर्वाद असुद्या ” अशी विनंती मनोभावे करीत होते.दिवसभरात या सोहळ्यात 50 हजार आबालवृद्ध सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला.

Comments are closed.