NGN News
Latest Marathi News

डॉ. प्रतिभा जाधव एकल पाल्य योजना समितीवर नियुक्त

  • एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची शासनाकडून दखल

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा

लासलगाव वरिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ लेखिका आणि प्रभावी वक्त्या डॉ. प्रतिभा जाधव यांची महाराष्ट्र शासनाच्या एकल पाल्य योजना समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकल महिलांच्या पुनर्वसन, सक्षमीकरण आणि न्यायासाठी त्यांनी अनेक वर्षे केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत शासनाने ही नियुक्ती केली आहे.

नाशिक येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, समीक्षक, एकपात्री नाट्य कलाकार आणि वक्त्या म्हणून डॉ. जाधव यांची ओळख आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून कोरोना एकल पुनर्वसन समितीमध्ये कार्यरत असून, अनेक एकल महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या पुनर्विवाहासाठीही पुढाकार घेतला आहे.

कोरोना काळातील एकल महिलांच्या वास्तव जीवनावर आधारित त्यांचा ‘दहा महिन्यांचा संसार’ हा कथासंग्रह विशेष गाजला असून, या पुस्तकाला राज्यातील अनेक प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या कथासंग्रहाचा ‘Untold Stories of Covid-19’ या नावाने इंग्रजी अनुवादही ऑथर्स प्रेस, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केला आहे.

डॉ. जाधव विविध नामांकित वृत्तपत्रांत सामाजिक आणि वैचारिक विषयांवर नियमितपणे परखड स्तंभलेखन करतात. तसेच त्या‘साहित्यसखी महिला साहित्यिक मंच’च्या संस्थापिका-अध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत.

या नियुक्तीबद्दल नूतन विद्या प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

Comments are closed.