- ‘स्टॉलवर्ट्स टॉक’तर्फे २६ नोव्हेंबरला विशेष कार्यक्रम; रस्त्यांची कामे, विलंबाची कारणे आणि भविष्यातील नाशिकच्या विकासाचा उलगडा होणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या भरीव निधीतून सुरू असलेली ही कामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित न राहता नाशिकच्या शाश्वत विकासाला चालना देणारी ठरावीत, असा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, या विकासकामांमुळे विशेषतः रस्त्यांच्या खोदकामांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिककरांना वाहतूक कोंडी, धूळ, पर्यायी मार्ग आणि दैनंदिन प्रवासातील अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही कामे नेमकी कधी पूर्ण होणार, त्यांना विलंब का होत आहे, रस्ते इतक्या खोलवर का खोदले जात आहेत आणि या सर्व प्रक्रियेनंतर नाशिकचे स्वरूप कसे बदलणार, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.
या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासकामांचे नेतृत्व करणारे सक्षम प्रशासकीय अधिकारी तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह हे नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. रस्त्यांच्या कामांचे नियोजन, त्यामागील तांत्रिक कारणे, कामांची सद्यस्थिती, पूर्णत्वाची कालमर्यादा आणि भविष्यातील नाशिकच्या विकासाचे चित्र याबाबत ते सविस्तर माहिती देणार आहेत. नागरिकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळावीत आणि सुरू असलेल्या विकासकामांबाबत वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, हा या संवादामागील मुख्य उद्देश आहे.
नाशिक शहर आणि नाशिकच्या विकासावर प्रेम करणाऱ्या नागरिकांसाठी ‘स्टॉलवर्ट्स टॉक’ या संस्थेच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गंगापूर रोडवरील श्री कुर्तकोटी सभागृह (शंकराचार्य न्यास) येथे हा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे, शेखर सिंह यांचे मार्गदर्शन प्रामुख्याने मराठी भाषेतून होणार आहे. नाशिकच्या विकासकामांबाबत थेट माहिती जाणून घेण्याची आणि आपल्या शंकांचे निरसन करून घेण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असल्याने सर्व सुजाण नागरिकांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ‘स्टॉलवर्ट्स टॉक’च्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed.