NGN News
Latest Marathi News

संविधान मूल्यांचा जागर; नाशिकमध्ये २६ नोव्हेंबरला ‘संविधान सन्मान सोहळा’

  • विविध क्षेत्रांतील ७७ मान्यवरांचा संविधानाची प्रत भेट देऊन होणार गौरव; संजय धिवरे, मोनिका राऊत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : भारतीय संविधानाने देशाला दिलेली लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती, नाशिक आणि बी. एम. ए. ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ७७ मान्यवरांचा संविधानाची प्रत भेट देऊन जाहीर सन्मान करण्यात येणार आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमातून संविधानिक मूल्यांचा जागर करण्याबरोबरच समाजहितासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता यांसह विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आणि आपल्या कार्यातून इतरांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या ७७ व्यक्तींना संविधानाची प्रत देऊन गौरविण्यात येणार आहे. संविधान हे केवळ देशाचा सर्वोच्च कायदा नसून प्रत्येक नागरिकाला समान हक्क, प्रतिष्ठा आणि न्यायाची हमी देणारा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे. या विचारांची जाणीव अधिक व्यापक व्हावी, तसेच संविधानाच्या मूल्यांनुसार समाजकार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.

हा सोहळा गुरुवारी सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, शिवाजी उद्यान परिसरात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राप्तिकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजय धिवरे, नाशिकच्या पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, आदिवासी विकास विभागाचे उपआयुक्त प्रदीप पोळ, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद सोनवणे उपस्थित राहणार आहेत. विविध प्रशासकीय, सामाजिक आणि माध्यम क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि स्वागताध्यक्ष मोहन अढांगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. संविधान दिनाचा उत्सव केवळ औपचारिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता संविधानातील विचार आणि मूल्ये प्रत्यक्ष सामाजिक जीवनात रुजावीत, या दृष्टिकोनातून या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच नागरिकांची कर्तव्ये, सामाजिक समरसता आणि लोकशाहीप्रती असलेली बांधिलकी यांचे महत्त्वही या निमित्ताने अधोरेखित होणार आहे. या सोहळ्यास नाशिककर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधानिक मूल्यांच्या या जागरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने विजय आहिरे, राजेश गागुर्डे, संजय खैरनार, मनोहर आहिरे, राजेश भालेराव, दीपक कटारे आदींनी केले आहे.

Comments are closed.