- नाशिकमध्ये डोंगरे मैदानावर रंगणार विचारांचा कुंभ
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विचारांचा प्रेरणादायी कुंभ आयोजित करण्याच्या संकल्पनेतून ३ जानेवारी २०२७ रोजी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘संवाद तरुणाईशी’ हा प्रेरणादायी कार्यक्रम होणार आहे. शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात तरुणाईने मोठ्या संख्येने नावनोंदणी करून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील आर्मस्ट्राँग रोबोटिक्स, विविध सामाजिक संस्था व नाशिककरांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अलिकडेच शहरातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली. त्यात आर्मस्ट्राँग रोबोटिक्स, आयएमए, निमा, रोटरी क्लब विविध मान्यवर सहभागी झाले होते. तुकाराम मुंढे यांचे विचार व प्रेरणेचा अधिकाधिक नागरिकांना, विशेषतः तरुणाईला लाभ व्हावा, त्यांनी यातून प्रेरीत होऊन राष्ट्रनिर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, या उद्देशाने ‘विचारांचा कुंभ’ची संकल्पना मांडण्यात आली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. हा कार्यक्रम स्वतःला तरुण समजणाऱ्या प्रत्येकासाठी खुला आहे. तुकाराम मुंढे हे आपल्या स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रिय कार्यशैली, प्रशासकीय अनुभव आणि सामाजिक प्रश्नांवरील परखड विचारांसाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव व जीवनविषयक दृष्टिकोनातून नागरिकांना व विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने चालून आली आहे. आजच्या तरुणाईसमोर करिअर, स्पर्धा, शिस्त, जीवनमूल्ये आणि सामाजिक जबाबदारी अशी अनेक आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर योग्य विचार, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा संवाद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
येथे करा नावनोंदणी
कार्यक्रम विनामूल्य असला तरीही पूर्वनोंदणी बंधनकारक आहे. कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभण्याची शक्यता लक्षात घेता अचूक नियोजन व गैरसोय टाळण्यासाठी इच्छुकांसाठी नावनोंदणीसाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुकांना https://forms.cloud.microsoft/r/VEhR224LLv या लिंकवर नावनोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी 9028673463 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments are closed.