** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : दिवाळीच्या सणाचा आनंद साजरा करताना औद्योगिक मालमत्तेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी विविध औद्योगिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. दिवाळीच्या सलग सुट्ट्यांच्या कालावधीत सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील कारखाने बंद राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि उद्योजकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी दिले.
निमा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या व्यासपीठावर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)चे अध्यक्ष आशिष नहार, अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)चे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, निमाचे उपाध्यक्ष मनीष रावळ, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, आयमाचे सरचिटणीस संजय महाजन, निमा ग्रीव्हन्स कमिटीचे चेअरमन कैलास पाटील, अंबड एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे आणि सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे आदी उपस्थित होते.
या बैठकीत दिवाळीच्या सुट्ट्यांच्या कालावधीत औद्योगिक परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविणे, विशेषतः रात्रीच्या वेळी अधिक दक्षता घेणे तसेच उद्योजकांनीही स्वतःच्या स्तरावर आवश्यक ती खबरदारी घेणे, या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. औद्योगिक वसाहतींमधील प्रत्येक कारखाना, त्यातील यंत्रसामग्री आणि मौल्यवान साहित्य सुरक्षित राहावे, यासाठी पोलीस प्रशासन आणि उद्योजकांनी परस्पर समन्वयाने काम करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
दिवाळीनिमित्त ८ ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अनेक कारखान्यांना सलग सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील मनुष्यवर्दळ कमी होऊन बहुतांश कारखाने बंद राहतील. अशा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन चोरीच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता उद्योजकांनी आपल्या कारखान्यांमधील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करावी, प्रवेशद्वारांवरील सुरक्षा नियंत्रण अधिक कडक करावे तसेच सुरक्षा रक्षकांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी केले.
सुट्ट्यांच्या कालावधीत पोलीस प्रशासनाकडून औद्योगिक वसाहतींमध्ये नियमित गस्तीबरोबरच रात्रीच्या वेळी विशेष गस्त वाढविण्यात येणार आहे. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. उद्योजकांनीही आपल्या सुरक्षा रक्षकांना सतर्क ठेवून कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाला थारा देऊ नये. पोलीस प्रशासन आणि उद्योजक यांच्यातील परस्पर समन्वयातूनच संभाव्य अनुचित प्रकारांना प्रभावीपणे आळा घालता येईल, असेही बारी यांनी स्पष्ट केले.
यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार आणि आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी औद्योगिक मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने मांडला. उद्योजक वर्षभर अथक परिश्रमातून उभी करीत असलेली संपत्ती, यंत्रसामग्री आणि उत्पादन साहित्य सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेऊन समाजकंटकांकडून चोरी अथवा अन्य कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेऊन डोळ्यांत तेल घालून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस प्रशासनाच्या या सुरक्षा मोहिमेत उद्योजकांकडूनही आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही नहार यांनी दिली.
औद्योगिक परिसराच्या सुरक्षिततेसाठी उद्योजकांनीही सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. सामूहिक दक्षता, परस्पर सहकार्य आणि योग्य नियोजन यांच्या माध्यमातून दिवाळीच्या सुट्ट्यांचा कालावधी सुरक्षितपणे पार पाडता येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस राजेंद्र कोठावदे, अविनाश बोडके, दिपाली चांडक, दिलीप वाघ, नितीन आव्हाड, जयश्री कुलकर्णी, गोविंद बोरसे, नानासाहेब देवरे, नीलिमा पाटील, भावेश भंसाळी, मंगेश गांधी, विनोद कुंभार, रावसाहेब रकिबे यांच्यासह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाईस, लघु उद्योग भारतीचे प्रतिनिधी, सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्टर्स, लेबर कॉन्ट्रॅक्टर्स मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.
Comments are closed.