NGN News
Latest Marathi News

शालार्थ आयडी चौकशीच्या नावाखाली शिक्षकांना वेठीस धरू नका!

नाशिक जिल्ह्यातील ९६७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांबाबत शिक्षक नेते आबासाहेब शिंदे यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शालार्थ आयडी चौकशीच्या नावाखाली नाशिक जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट त्रास देण्याचे काम थांबवावे, अशी मागणी शिक्षक नेते आबासाहेब शिंदे यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात सन २०१२ पासून नियुक्त झालेल्या सुमारे ९६७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा मान्यतेच्या फाइल्समधील त्रुटी आणि मूळ कागदपत्रांच्या उपलब्धतेवरून सध्या गोंधळ निर्माण झाला आहे. अनियमितता असलेल्या प्रकरणांची चौकशी करण्यास शिक्षकांचा विरोध नसून, सर्व कागदपत्रे योग्य असलेल्या आणि सक्षम अधिकाऱ्यांकडून मान्यता प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना विनाकारण वेठीस धरू नये, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे.

शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, २४ ऑक्टोबर रोजी त्रुटींच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या, तर २६ ऑक्टोबरपर्यंत मूळ कागदपत्रे कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले. रविवारची सुट्टी आणि मोठ्या शैक्षणिक संस्थांमधील कागदपत्रे शोधण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, एवढ्या कमी मुदतीत सर्व फाइल्स उपलब्ध करून देणे अवघड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता देताना मूळ कागदपत्रांची एक प्रत जिल्हा परिषदेकडे कायमस्वरूपी जमा असते. त्यामुळे ती कागदपत्रे कार्यालयात उपलब्ध असतानाही शिक्षकांना वारंवार फोन करून फाइल्स सादर करण्यासाठी तगादा लावणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. २०१६ पूर्वी शालार्थ आयडीची प्रक्रिया अस्तित्वात नव्हती, त्यामुळे त्या काळातील फाइल्समधील त्रुटींचा विचार करताना संबंधित परिस्थिती लक्षात घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या प्रथम सत्र परीक्षांचा कालावधी सुरू असून, त्यातच दिवाळीचा सण जवळ आल्याने अशा आदेशांमुळे शिक्षकांवर मानसिक ताण वाढत असल्याची चिंता शिंदे यांनी व्यक्त केली. ज्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची कमतरता आहे किंवा नियुक्ती व मान्यतेबाबत अनियमितता आढळते, अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केलेल्या, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता प्राप्त केलेल्या आणि शिक्षण उपसंचालकांकडून शालार्थ आयडी मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात अडकवू नये, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष घालून शिक्षण आयुक्त आणि राज्यातील वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे. शिक्षण विभागाचा कारभार सांभाळणारे मंत्री दादाजी भुसे यांनीही या प्रश्नात हस्तक्षेप करून चौकशीची प्रक्रिया एकदाच पूर्ण करावी आणि प्रामाणिक शिक्षकांना वारंवार त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. दोषींवर कठोर कारवाई करण्यास कोणाचाही विरोध नसून, दोषींना सोडून प्रामाणिक कर्मचाऱ्यांना शिक्षा होऊ नये, हीच शिक्षकांची अपेक्षा आहे. शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण थांबवून त्यांना सन्मानाने काम करता यावे आणि दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिक्षक नेते आबासाहेब शिंदे यांनी केली आहे.

Comments are closed.