NGN News
Latest Marathi News

कालवा अस्तरीकरण निर्णय गावनिहाय परिस्थिती तपासूनच घ्या; खा. वाजेंची ठाम भूमिका

  • गोदावरी उजव्या तट कालव्याच्या अस्तरीकरणावरून शेतकरी आक्रमक; खासदार राजाभाऊ वाजेंसह शेतकऱ्यांचा कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : गोदावरी उजव्या तट कालव्याच्या प्रस्तावित सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणामुळे शेतकरी, भूजल पुनर्भरण आणि ग्रामीण भागातील जलसुरक्षेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करून या कामाबाबत योग्य निर्णय घ्यावा, या मागणीसाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्थानिक गावांमधील शेतकऱ्यांच्या समवेत गोदावरी कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावातील स्थानिक परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या गरजा विचारात घेऊनच अस्तरीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

गोदावरी उजव्या तट कालव्याच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांतर्गत सिमेंट काँक्रिट अस्तरीकरण प्रस्तावित आहे. मात्र, कालव्याच्या परिसरातील अनेक गावांमध्ये विहिरी, बोअरवेल, कूपनलिका आणि इतर जलस्रोतांचे पुनर्भरण कालव्यातील पाण्याच्या झिरपण्यावर अवलंबून असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरसकट सिमेंट काँक्रिट अस्तरीकरण केल्यास भूजल पुनर्भरणावर परिणाम होण्याची तसेच शेतीसाठी आवश्यक पाण्याच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कालव्याच्या पाण्यावर परिसरातील शेतकऱ्यांची शेती, फळबागा, भाजीपाला उत्पादन आणि पशुपालन अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कालव्याचे अस्तरीकरण करताना जलगळती रोखण्याबरोबरच भूजल पुनर्भरण, स्थानिक जलस्रोतांची स्थिती आणि भविष्यातील पाणी उपलब्धता यांचाही शास्त्रीय पद्धतीने विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे तांत्रिक अभ्यास आणि स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव यांच्या आधारे निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना प्रत्येक गावातील परिस्थिती वेगवेगळी असल्याने सर्व ठिकाणी एकाच पद्धतीने अस्तरीकरण करण्याऐवजी गावनिहाय आवश्यकता तपासावी, अशी भूमिका मांडली. कोणत्या गावात किती अंतरापर्यंत सिमेंट काँक्रिट अस्तरीकरण आवश्यक आहे, कोणत्या भागात अस्तरीकरणाचा भूजल पुनर्भरणावर परिणाम होऊ शकतो आणि कुठे पर्यायी उपाययोजना करता येतील, याबाबत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.

संयुक्त स्थळपाहणी करून गावनिहाय निर्णय
याचर्चेनंतर प्रशासनाने संबंधित कालवा परिसरात प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत गावनिहाय परिस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे. या पाहणीत स्थानिक जलस्रोत, भूजल पुनर्भरणाची स्थिती, शेतीच्या पाण्याची गरज आणि अस्तरीकरणाची तांत्रिक आवश्यकता यांचा विचार केला जाईल. त्यानंतर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांशी विचारविनिमय करून त्यांच्या सहमतीने योग्य तोडगा काढण्याची भूमिका प्रशासनाने मांडली. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कालव्याच्या दुरुस्तीची कामे आणि भूजल पुनर्भरण या दोन्ही बाबींमध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा अभ्यास न करता अस्तरीकरणाचे काम पुढे नेऊ नये, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.

—

गोदावरी उजव्या तट कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांचे हित, भूजल पुनर्भरण आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता यांचा प्राधान्याने विचार होणे आवश्यक आहे. प्रत्येक गावातील परिस्थिती वेगळी असल्याने प्रशासनाने स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून, त्यांना विश्वासात घेत आणि त्यांच्या सहमतीनेच योग्य निर्णय घ्यावा. :

  • राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

Comments are closed.