NGN News
Latest Marathi News

सीए इंटरमिजिएट परीक्षेत नाशिकच्या साक्षी चांडकचा देशात डंका!

  • ५०२ गुणांसह संयुक्तपणे अखिल भारतीय प्रथम क्रमांक; नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेत नाशिकच्या साक्षी चांडक हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. साक्षीने ६०० पैकी ५०२ गुण मिळवत ८३.६७ टक्के गुणांसह संपूर्ण देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शहराच्या शैक्षणिक गुणवत्तेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

ICAI च्या अधिकृत निकालानुसार, मुंबईचा नील राजेश शाह आणि नाशिकची साक्षी चांडक या दोघांनीही प्रत्येकी ५०२ गुण मिळवत अखिल भारतीय स्तरावर संयुक्त प्रथम क्रमांक मिळविला. चेन्नईची श्रुती व्ही हिने ४९२ गुणांसह द्वितीय, तर सुरतचा प्रेम अग्रवाल याने ४९० गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. परीक्षेच्या निकालातील आकडेवारीनुसार, ग्रुप एकमध्ये १,००,३०१ विद्यार्थ्यांपैकी २३,२१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ग्रुप दोनमध्ये ६८,४०० विद्यार्थ्यांपैकी १२,९३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या ३८,३३९ विद्यार्थ्यांपैकी ५,०६६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

नाशिकच्या दोन ‘साक्षीं’ची राष्ट्रीय स्तरावर चमक

नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी हे यश विशेष अभिमानास्पद ठरले आहे. मे २०२६ मध्ये झालेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिने प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर आता साक्षी चांडक हिने सीए इंटरमिजिएट परीक्षेत देशात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावल्याने नाशिकच्या दोन विद्यार्थिनींनी आपल्या गुणवत्तेची देशभरात छाप उमटवली आहे. साक्षी चांडक हिच्या यशामागे असलेली मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा सीए क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

  • प्रा. सीए लोकेश पारख, कॉमर्स व सीए मार्गदर्शक

Comments are closed.