NGN News
Latest Marathi News

सामूहिक कन्यापूजन कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की; अंनिसचा पुढाकार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : द आर्ट ऑफ लिविंग ,वैदिक धर्म संस्थान महाराष्ट्र व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील मुलींना सामूहिक कन्यापूजन, होम हवन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ( अंनिस) त्यावर आक्षेप घेतल्याने सदर कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढवली.

प्राप्त माहितीनुसार, प्रसाद पिंपळे, समन्वयक, कन्या पूजन सोहळा असे नाव असलेल्या पत्राद्वारे नाशिक महानगरपालिका शाळांतील मुख्याध्यापकांना असे कळवण्यात आले होते की, नवरात्र महोत्सवानिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलींना सामूहिक कन्यापूजनासाठी शनिवार ( दि. १७ ) रोजी शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणी शाळेच्या वेळेत सकाळी साडेदहा वाजता घेऊन यावे आणि पूजा तसेच होम हवन याचा लाभ घ्यावा, सोबत शिक्षक- शिक्षिकांनीही लाभ घ्यावा.

कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर काही वेळापूर्वी हे पत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्या हाती लागले.
त्यानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी तत्काळ नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्याशी संपर्क करून,याबाबत विचारणा केली.

डॉ. मिता चौधरी यांनी सांगितले की सदर धार्मिक संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केला होता. म्हणून हा संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला. मात्र डॉ.गोराणे यांनी ही बाब भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याशी कशी विसंगत आहे.तसेच भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. हे सर्व लक्षात आणून दिले. मुलींना संरक्षणाची, सन्मानाची जास्त गरज आहे, हेही त्यांनी नमूद केले.
शिक्षणातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे अपेक्षित आहे.मात्र देव,धर्म,अध्यात्म्याच्या नावाखाली अंधश्रद्धायुक्त, अवैज्ञानिक गोष्टी, कर्मकांडे संस्कारक्षम वयात सामुदायिक पातळीवर विद्यार्थ्यांना जर कुणी करायला भाग पाडत असतील तर विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी ती मोठी बाधा ठरू शकते. ही बाब डॉ. चौधरी यांनी तत्काळ लक्षात घेऊन, हा सामुदायिक कन्या पूजनाचा व होमाचा कार्यक्रम रद्द करीत असल्याचे आणि या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी जाऊ नये अशा प्रकारचा लेखी आदेश ( मेसेज )तत्काळ सर्व संबंधितांना पाठवला.

एखाद्या धार्मिक संघटनेच्या प्रतिनिधीच्या नावाचे पत्र मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका यांना पाठवणे आणि श्रद्धा,, पूजा यांच्या नावाखाली असा सामूहिक कन्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करणे, ही बाब पूर्णतः चुकीची आहे, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाम मत आहे. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे व कृष्णा चांदगुडे यांनी तमाम श्रद्धाळू, भाविक, नागरिक यांना नम्र आवाहन केले आहे की समितीचा देव, धर्म, अध्यात्म, श्रद्धा, उपासना, अभिव्यक्ती, विचार यांना अजिबात विरोध नाही. मात्र त्यांच्या नावाखाली जर कोणी अशा प्रकारचे सामूहिक पातळीवर कुठले तरी अवैज्ञानिक आणि भारतीय राज्यघटनेतील मूल्यांची विसंगत असे कर्मकांडे करायला भाग पाडत असतील, त्याद्वारे शोषण होत असेल तर अशा कार्यक्रमांना लोकांनी उपस्थित राहू नये, सहभागी होऊ नये.

Comments are closed.