NGN News
Latest Marathi News

सप्तशृंग गडावर ‘खाकी पॅटर्न’; सप्तमीच्या गर्दीवर यशस्वी नियंत्रण !

  • बॅरिकेडिंगद्वारे टप्प्याटप्प्याने दर्शन; पोलीस, ग्रामपंचायत आणि ट्रस्टच्या समन्वयातून भाविकांसाठी सुविधा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सप्तशृंगगड / रघुवीर जोशी

शारदीय नवरात्रोत्सवातील सप्तमीच्या दिवशी सप्तशृंगगडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली असतानाही नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनाने नियोजनबद्ध बंदोबस्तातून गर्दीवर प्रभावी नियंत्रण मिळविले. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करून भाविकांना टप्प्याटप्प्याने थांबवून पुढे सोडण्याच्या व्यवस्थेमुळे दर्शनाची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत झाली. पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले.

गर्दीला शिस्त; वाहनांवर नियंत्रण

दर्शनमार्गावरील रेटारेटी टाळण्यासाठी गर्दीच्या प्रवाहाचे नियोजन करण्यात आले. अनावश्यक वाहन पासेसवर नियंत्रण, वाहनांच्या प्रवेशाचे नियोजन आणि व्हीआयपी भाविकांसाठी नांदुरी येथून स्वतंत्र बसची व्यवस्था, यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यावर भर देण्यात आला. भाविकांशी सौजन्याने वागून त्यांच्या अडचणींना तातडीने प्रतिसाद देण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

अतिक्रमण हटवून मार्ग मोकळे

शिवालय तलाव, म्हादेवी परिसर, वायरलेस पोलीस स्टेशनसमोरील जागा आणि रोप-वे परिसरातील अडथळे व अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. यामुळे भाविकांच्या ये-जा करण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध होण्यास मदत झाली.

ग्रामपंचायत, ट्रस्टचेही योगदान

भाविकांना उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी पोलीस चौकीपासून रोप-वे ट्रॉली प्रवेशद्वारापर्यंत सुमारे ५०० मीटर मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. धोंड्या कोंड्याच्या विहिरीपासून पुढे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे नियोजन, महत्त्वाच्या चौकांत सीसीटीव्ही आणि ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना अशा सुविधांवरही भर देण्यात आला आहे.

अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन

पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मिरा शंखे आणि तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडून बंदोबस्ताचा नियमित आढावा घेतला जात आहे. सोशल मीडियावरील जुने व्हिडिओ आणि अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत आणि ट्रस्ट यांच्या समन्वयातून भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन देण्यावर भर देण्यात येत आहे.

Comments are closed.