
- ललिता पंचमीच्या पावन पर्वावर काळाराम मंदिरात पुष्पमाला अर्पण करून भगवान परशुराम यांच्या ५४ फूट उंच भव्य प्रतिमेच्या अनावरण सोहळ्यासाठी प्रभू श्रीरामांना प्रत्यक्ष निमंत्रण
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : विप्र फाउंडेशन नाशिक झोन व नाशिक जिल्ह्याच्या वतीने ललिता पंचमी, नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून नाशिक येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांना पुष्पमाला अर्पण करून अरुणाचल प्रदेशातील लोहित कुंड येथे उभारण्यात आलेल्या शक्ती पुंज परशुराम अर्थात भगवान श्री परशुराम यांच्या ५४ फूट उंच भव्य प्रतिमेच्या अनावरण सोहळ्यासाठी सादर निमंत्रण अर्पण करण्यात आले.
विप्र फाउंडेशनच्या १७ वर्षांच्या वाटचालीतील दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. जयपूर येथील प्रथम प्रकल्प श्री परशुराम ज्ञानपीठाच्या लोकार्पणानंतर अरुणाचल प्रदेशात निर्माणाधीन असलेला ‘शक्तिपुंज परशुराम’ अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ स्ट्रेंथ’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प याच आर्थिक वर्षात पूर्ण करून राष्ट्राला समर्पित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नववर्ष २०२७ च्या प्रारंभी जगातील सर्वांत मोठ्या भगवान परशुराम प्रतिमेच्या भव्य अनावरण सोहळ्याचे आयोजन प्रस्तावित आहे. या ऐतिहासिक प्रकल्पांच्या निमित्ताने देशभरात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात ‘देव आमंत्रण परिक्रमे’च्या पुढील टप्प्यात प्रभू श्रीरामांना निमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान परशुराम यांच्या भव्य प्रतिमेच्या अनावरण सोहळ्यासाठी देशव्यापी निमंत्रण अभियान म्हणून श्री रामांना आमंत्रण पत्रिका अर्पण करण्यात आली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश भगवान परशुराम यांचे आदर्श, भारतीय संस्कृती, शिक्षण आणि संस्कार यांचा संदेश व्यापक स्तरावर समाजापर्यंत पोहोचविणे हा आहे. या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमात प्रभू श्रीरामचंद्रांच्या श्रीचरणी पुष्पमाला अर्पण करण्यात आली. तसेच भगवान परशुराम यांच्या ५४ फूट उंच भव्य प्रतिमेच्या अनावरण सोहळ्याचे प्रत्यक्ष निमंत्रणपत्र अर्पण करून कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा आणि संपूर्ण समाजाचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
या उपक्रमातून धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. भगवान श्रीराम व भगवान परशुराम यांच्या आदर्शांचे स्मरण करून समाजात धर्मनिष्ठा, सदाचार, त्याग, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला विप्र फाउंडेशनचे अनेक प्रमुख पदाधिकारी व समाजसेवक उपस्थित होते. त्यामध्ये नाशिक झोन १२-डीचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाश शर्मा, महासचिव श्री. ओमप्रकाश गौड, नाशिक जिल्हाध्यक्ष श्री. पवनजी जोशी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. शामसुंदरजी जोशी, मार्गदर्शक डॉ. दुष्यंतजी दधीच आणि उपाध्यक्ष श्री. प्रमोदजी व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी श्री. धनंजय पुजारीजी यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी धार्मिक परंपरांचे जतन, सामाजिक सहभाग आणि भगवान परशुराम यांच्या आदर्शांचा प्रसार यांचे महत्त्व अधोरेखित केले.
अरुणाचल प्रदेशातील लोहित कुंड येथे उभारण्यात येत असलेली भगवान परशुराम यांची ५४ फूट उंच भव्य प्रतिमा अर्थात शक्तिपुंज परशुराम’ ही भारतीय सांस्कृतिक श्रद्धा, आध्यात्मिक चेतना आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे.
या भव्य प्रतिमेच्या अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून भगवान परशुराम यांचे शौर्य, तपश्चर्या, त्याग, न्यायप्रियता आणि धर्मरक्षणाचे आदर्श देशभरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
विप्र फाउंडेशन नाशिक झोन व नाशिक जिल्ह्याच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक संघटन यांचा सुंदर संगम ठरत आहे. प्रभू श्रीरामांना प्रत्यक्ष निमंत्रण अर्पण करून आयोजकांनी आगामी अनावरण सोहळ्याच्या यशस्वितेसाठी, समाजाच्या समृद्धीसाठी आणि राष्ट्राच्या मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली.
Comments are closed.