
- क्रांती रेडकर आणि सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती; २५ हून अधिक इव्हेंट ऑर्गनायझर्सचा पुढाकार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : उत्सव केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा प्रयत्न नाशिक इव्हेंट अँड डेकोर असोसिएशन (NEDA)ने केला आहे. असोसिएशनतर्फे आयोजित ‘ NEDA’s Raas RANG! 2.0’ या तीन दिवसीय दांडिया महोत्सवाच्या निमित्ताने प्रबोधिनी विद्या मंदिरातील पाच विशेष मुलांना दत्तक घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रायोजक, सहकार्यकर्ते आणि इव्हेंट क्षेत्रातील व्यावसायिकांच्या सहभागातून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा हा उपक्रम महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरणार आहे.
१६ ते १८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान हॉटेल पाम स्प्रिंग रिसॉर्ट येथे हा महोत्सव होणार आहे. नाशिकमधील २५ हून अधिक इव्हेंट ऑर्गनायझर्स आणि इव्हेंट मॅनेजर्स यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित या महोत्सवात मनोरंजनासोबत सामाजिक योगदान आणि व्यावसायिक सहकार्यावर भर देण्यात आला आहे.
‘We Adopt’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकी
‘We Adopt’ या उपक्रमांतर्गत प्रबोधिनी विद्या मंदिरातील पाच विशेष मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय NEDAने घेतला आहे. उत्सवाच्या माध्यमातून विशेष मुलांच्या गरजांसाठी योगदान देणे आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश पोहोचवणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या प्रयत्नात प्रायोजक आणि सहकार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.
क्रांती रेडकर आणि सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, १६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री क्रांती रेडकर आगामी मराठी चित्रपट मैत्रीच्या कलाकारांसह उपस्थित राहणार आहेत. १७ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असेल.
दांडिया रास, विविध खेळ, सेल्फी बूथ, AI फोटो बूथ आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ही महोत्सवाची प्रमुख आकर्षणे असतील. दांडिया ग्रुप स्पर्धेतील विजेत्या संघाला 3 lakh रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. इव्हेंट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी B2B नेटवर्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
इव्हेंट क्षेत्रातील एकजुटीचा उपक्रम
NEDAचे अध्यक्ष प्रवीण कमले म्हणाले, “नाशिकमधील इव्हेंट क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणून शहरासाठी दर्जेदार उपक्रम उभा करणे, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याची संधीही या महोत्सवातून मिळत आहे.”
NEDAचे सचिव तुषार श्रीवास्तव यांनी सांगितले की, दांडियाच्या माध्यमातून नाशिककरांना मनोरंजनाचा वेगळा अनुभव देतानाच सामाजिक कार्यासाठीही एकत्र येण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रायोजक आणि सहकार्यकर्त्यांच्या सहभागातून पाच विशेष मुलांना दत्तक घेण्याचा संकल्प साकारण्यात येत आहे.
NEDAचे उपाध्यक्ष रूपेश गुप्ता आणि कुणाल जग्गी यांनी महोत्सवातून मनोरंजनासोबत व्यावसायिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला. खजिनदार सरफराज सैयद यांनी मर्यादित प्रवेश क्षमतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पासेसचे आगाऊ बुकिंग करावे, असे आवाहन केले. महोत्सवाचे पासेस BookMyShow वर उपलब्ध आहेत. नाशिककरांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments are closed.