
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाकाठावर साकारल्या जाणाऱ्या ‘रामझुला’ पुलाच्या बांधकामात बाधित होणाऱ्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आणि आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी गोदाकाठ येथील स्वामी समर्थ केंद्राच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन भेट दिली व उपस्थित भाविक आणि सेवेकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.
रामझुल्याच्या कामासाठी महापालिकेकडून सेवा केंद्र हटवण्याबाबत नोटीस देण्यात आल्यानंतर भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त मनीषा खत्री यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रामझुल्याच्या कनेक्टिंग रोडचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या खाली उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागेत स्वामी समर्थ केंद्र पुनर्बांधणीसाठी महापालिकेकडून अधिकृतपणे जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन आयुक्त खत्री यांनी यावेळी दिले.
त्याचप्रमाणे, केंद्राच्या नवीन बांधकामासाठी लागणारा आवश्यक निधी आमदार स्थानिक विकास निधीतून तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी उपस्थित सेवेकऱ्यांना दिली. या आश्वासनामुळे सेवेकऱ्यांमधील संभ्रम आणि नाराजी दूर झाली असून त्यांनी प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
या पाहणी दौऱ्यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका अदिती पांडे, नगरसेवक राहुल शेलार यांच्यासह निखिल पवार नगरसेविका मयूरी पवार विनायक पांडे,अंकुश पवार, अमर खैरे, योगेश शिरापुरे, केशव घोडेराव, अश्विनी अंबेकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी व भाविक उपस्थित होते.
Comments are closed.