NGN News
Latest Marathi News

आधी प्रेमाचे जाळे, मग धमकीसत्र आणि पाठोपाठ खंडणी; नाशकात प्राध्यापिकेवर..

  • खासगी व्हिडिओ आणि चॅट्स व्हायरल करण्याची धमकी; तरुणास बेड्या

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान झालेल्या ओळखीतून एका माजी विद्यार्थ्याने महिला प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा ऑनलाइन छळ केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला आहे. संबंधित तरुणाने प्रेमालापातून तयार केलेले खासगी व्हिडिओ आणि चॅट्स व्हायरल करण्याची धमकी देत प्राध्यापिकेकडे तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. याप्संरकरणी संशयित चेतन राजाराम आढे ऊर्फ राठोड (रा. अंबड, जालना) याला गंगापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, संशयित चेतन हा पीडित महिला प्राध्यापिका कार्यरत असलेल्या महाविद्यालयात पूर्वाश्रमीचा विद्यार्थी होता. काही कालावधीनंतर संशयिताने संपर्क वाढवत प्राध्यापिकेला प्रेमसंबंधात ओढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचदरम्यान संशयिताने प्राध्यापिकेचे खासगी स्वरूपाचे व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड केले. संशयिताने प्राध्यापिकेला महाराष्ट्राबाहेर एका आठवड्याच्या सहलीला येण्यासाठी आग्रह धरला. तथापि, प्राध्यापिकेने सहलीला जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर संशयिताने व्हिडिओ कॉल आणि चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने प्राध्यापिकेकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे अखेर पीडित प्राध्यापिकेने गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित चेतन राठोड याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चेतनला अटक केली आहे.

Comments are closed.