NGN News
Latest Marathi News

नाशकात बम्पर गुंतवणूक ! ₹57,120 कोटींच्या आठ प्रकल्पांना चालना

  • सेमीकंडक्टर, संरक्षण, डेटा सेंटरसह विविध क्षेत्रांत गुंतवणूक; 24,125 रोजगारनिर्मितीची क्षमता

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सामंजस्य करारांमधून नाशिक जिल्ह्यासाठी तब्बल ₹57,120 कोटींच्या प्रस्तावित गुंतवणुकीचे आठ प्रकल्प समोर आले आहेत. या प्रकल्पांमधून सुमारे 24,125 रोजगारनिर्मितीची क्षमता निर्माण होणार आहे. यापूर्वी नाशिकसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या सुमारे ₹35,000 कोटींच्या गुंतवणुकीव्यतिरिक्त ही नवी गुंतवणूक असल्याने नाशिकच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रस्तावित गुंतवणुकीमध्ये सेमीकंडक्टर, संरक्षण उत्पादन, डेटा सेंटर, पुनर्वापर उद्योग यांसह विविध आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिकची पारंपरिक उत्पादनकेंद्र अशी असलेली ओळख विस्तारून शहर व जिल्हा उच्च तंत्रज्ञान, आधुनिक उत्पादन, डिजिटल पायाभूत सुविधा आणि विविधांगी उद्योगांचे केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर प्रस्तावित असलेल्या या गुंतवणुकीमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबरोबरच पूरक उद्योग, सेवा क्षेत्र, कौशल्य विकास आणि लॉजिस्टिक क्षेत्रालाही चालना मिळू शकते.

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) गेल्या काही काळापासून नाशिकला देशातील प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सातत्याने औद्योगिक अजेंडा मांडत आहे. या पार्श्वभूमीवर नव्या प्रकल्पांची घोषणा ही नाशिकच्या औद्योगिक वाटचालीसाठी महत्त्वाची बाब असल्याचे अध्यक्ष आशिष नहार यांनी म्हटले आहे. प्रस्तावित प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास नाशिकच्या औद्योगिक परिसंस्थेला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, सामंजस्य करारांनंतर प्रस्तावित गुंतवणुकीचे प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतर होणे हा पुढील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यासाठी जमीन, पायाभूत सुविधा, वीज, पाणी, वाहतूक, पर्यावरणीय मंजुरी आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.

 उद्योग, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून या प्रकल्पांना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी निमा कटिबद्ध असल्याचे नहार यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर येऊ घातलेल्या या गुंतवणुकीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी खालील 8 प्रकल्पांचा समावेश आहे :

Pi-Semicon Pvt. Ltd.

गुंतवणूक : ₹40,000 कोटी

रोजगार : 12,750

ठिकाण : नाशिक

क्षेत्र : डेटा सेंटर, IT/ITeS, सेमीकंडक्टर

Atri Energy Transition Pvt. Ltd.

गुंतवणूक : ₹4,000 कोटी

रोजगार : 2,575

ठिकाण : नाशिक

क्षेत्र : डेटा सेंटर, IT/ITeS, इलेक्ट्रॉनिक्स व सेमीकंडक्टर

Indrajaal Pvt. Ltd.

गुंतवणूक : ₹2,400 कोटी

रोजगार : 1,100

ठिकाण : नाशिक

क्षेत्र : एरोस्पेस व संरक्षण

Haier Pvt. Ltd.

गुंतवणूक : ₹2,000 कोटी

रोजगार : 1,800

ठिकाण : नाशिक

क्षेत्र : डेटा सेंटर, IT/ITeS, इलेक्ट्रॉनिक्स व सेमीकंडक्टर

Virtuoso Optoelectronics

गुंतवणूक : ₹1,050 कोटी

रोजगार : 1,300

ठिकाण : चांदवड

क्षेत्र : डेटा सेंटर, IT/ITeS, इलेक्ट्रॉनिक्स व सेमीकंडक्टर

Chiripal Poly Films

गुंतवणूक : ₹1,858 कोटी

रोजगार : 2,000

ठिकाण : दिंडोरी

क्षेत्र : केमिकल्स, कृषी, सेवा व जीसीसी 

Dalmia Polypro Industries

गुंतवणूक : ₹800 कोटी

रोजगार : 2,000

ठिकाण : नाशिक

क्षेत्र : केमिकल्स, कृषी, सेवा व जीसीसी 

Revalyu Recycling (India)

गुंतवणूक : ₹1,012 कोटी

रोजगार : 600

ठिकाण : नाशिक

क्षेत्र : डेटा सेंटर, IT/ITeS, इलेक्ट्रॉनिक्स व सेमीकंडक्टर

या आठ प्रकल्पांची एकूण प्रस्तावित गुंतवणूक ₹53,120 कोटी असून सुमारे 24,125 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

Comments are closed.