NGN News
Latest Marathi News

नाविन्य, इतरांनी सुचवलेले बदल स्वीकारणे जड का जाते? (विशेष/मीनाक्षी जगदाळे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सातत्याने नवीन शिकणे, स्वतःला काळानुसार बदलणे किंवा स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हे ऐकायला खूप सोपे वाटते. आपण बघतो की प्रत्यक्ष कृतीत या गोष्टी आणताना अनेक लोक त्याला विरोध करतात. हा विरोध केवळ आळसामुळे नसून त्यामागे खोलवर रुजलेली मानसशास्त्रीय काय कारणे असतात हे आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत..

कंफर्ट झोनची सवय (Comfort Zone Alignment)असणे हे मुख्य कारण जे माणसाला नवीन गोष्टी आत्मसात करू देत नाही. माणसाचा मेंदू नेहमी ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. जुन्या सवयी आणि विचारसरणीमध्ये मेंदूला कमी ताण घ्यावा लागतो कारण त्याचा सराव आपल्या मेंदूला झालेला असतो. नवीन काही शिकताना किंवा बदलताना मेंदूला नवीन न्यूरल पाथवेज (Neural Pathways) तयार करावे लागतात, ज्यासाठी मानसिक ऊर्जेची गरज लागते यामुळे कोणतीही गोष्ट नव्याने शिकून अंमलात आणणे टाळले जाते.

अपयशाची आणि अनिश्चिततेची भीती(Fear of Unknown & Failure) म्हणजे लोकांना पहिले प्रश्न पडतो की “नवीन शिकताना मी चुकलो तर?” किंवा “बदल स्वीकारल्याने माझे नुकसान झाले तर?” कधीकधी वयस्कर लोक, जुन्या पिढीतील लोक नवीन पिढीच्या पद्धतीना लवकर स्वीकारू शकत नाही. बहुतांश वेळा त्यांना असे वाटते की आता हे जे चाललं आहे तो पैशाचा अपव्यय आहे, याची गरज नाही, यातून नुकसान होईल. चुकण्याची भीती सुद्धा अनेकदा वयस्कर लोकांना असते. मोबाईल, लॅपटॉप, नवीन प्रकारची वाहने, प्रसार माध्यमाचा वापर, ऑनलाईन खरेदी व व्यवहार अथवा नेट बँकिंग, नवीन गॅझेट्स वापरणे यासारख्या गोष्टी करताना चुकण्याची भीती वयस्कर लोकांना जास्त सतावते. अश्या स्वरूपाची भीती या लोकांना जुन्या पद्धतींनाच पकडून ठेवण्यास भाग पाडते. अश्या प्रकारची भीती अगदी एखाद्या गृहिणी मध्ये पण बघायला मिळते. स्वयंपाक घरातील नवीन वस्तूंचा वापर, नवीन पाककृती, घरातील राहणीमानाचा दर्जा वाढवणारे साहित्य, सामान वापरायला शिकणे अनेक महिलांना अवघड वाटते.

अहंकार आणि स्व-प्रतिमा (Ego & Self-Identity) हा खूप मोठा मुद्दा बदल स्वीकारण्यासाठी अडथळा ठरतो. कोणीतरी सांगितलेला बदल स्वीकारणे म्हणजे “मी आत्तापर्यंत चुकीचा होतो” किंवा “समोरचा माणूस माझ्यापेक्षा हुशार आहे” असा गैरसमज अनेक लोक करून घेतात. याचे उदाहरणं द्यायचे झाले तर घरात नवीन आलेल्या सुनेने घराला काही बाबतीत अत्याधुनिक बनवण्याचा प्रयत्न केला, नवीन पद्धतीच्या पाककृती केल्या तर सासू चा अथवा घरातील इतर जेष्ठ महिलांचा अहंकार जागृत होतो. काल आलेली सून आम्हाला सांगणार का? हिच ऐकून आम्ही नवीन गोष्टी का कराव्यात? इतके वर्ष आम्ही काही चुकीचं करत होतो का? आम्हाला काही बनवता येत नाही का? इतके वर्ष सगळे उपाशी राहिले का? हे संवाद घरोघरी सुरू असतात. अश्या अहंकारामुळे नवीन सुनेचे अथवा तरुण मुलींचे मार्गदर्शन स्वीकारण्यास जेष्ठ महिला नकार देतांना दिसतात आणि एकंदरीत कौटुंबिक कलह वाढणे आणि घर मागासलेले च राहणे असे परिणाम होतात.

स्थित्यंतर विरोध (Status Quo Bias) म्हणजे मानसशास्त्रानुसार, माणसाला सध्याची परिस्थिती मग ती कितीही वाईट असली तरी सुरक्षित वाटते कारण त्या परिस्थिती ची माणसाच्या शरीराला, मनाला, मेंदूला सवय झालेली असते. वेगळ्या अथवा नवीन पण अनोळखी असलेल्या चांगल्या बदलापेक्षाहि परिचित वाईट परिस्थिती हाताळणे लोकांना सोपे वाटते. या बद्दल ची अनेक उदाहरणे आपण दैनंदिन व्यवहारात पाहतो. अनेक जण खूप जुने धोकादायक झालेले घर सोडायला तयार नसतात, खूप जुनी गाडी जीं चालवणे आता जोखमीचे आहे ती बदलायला तयार नसतात, जुनी यंत्र सामुग्री अथवा अगदी एखादा जुना मित्र, ओळखीतला अथवा नात्यातला व्यक्ती ज्याच्या मुळे कितीही नुकसान अथवा त्रास होत असेल तरी तोच योग्य वाटतो. जुनं नातं सोडून नवीन नातं स्वीकारायला सुद्धा अनेकदा नकार दिला जातो.

नकारात्मक स्व-संवाद (Negative Self-Talk) हा प्रकार बहुतांश लोकांना काळानुसार बदलू देत नाही. माझे वय आता झाले आहे, मला हे जमणारच नाही, या वयात असं वागणं शोभणार नाही, माझा स्वभाव असाच आहे, या वयात गाडी शिकून मला कुठे जायच आहे, या वयात चांगल राहून मला कोण पाहणार आहे, मी आता असं काही केल तर समाज काय म्हणेल अशी वाक्य आपण सर्रास ऐकतो. अशा प्रकारच्या मर्यादा स्वतःभोवती आखून घेतल्यामुळे या लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. असे लोकं घरात, समाजात मागे पडतात आणि जे काळानुसार बदलत आहेत त्यांच्याशी जुळवून घ्यायला असमर्थ ठरतात. आपल्याला जर त्याच रटाळ, जुन्या विचारसरणीशी, त्रासदायक नात्याशी, नं आवडणाऱ्या परिस्थितीशी अथवा वस्तूंशी झगडत बसायचं, रडत राहायचं असेल तर बंद पडलेल्या घड्याळासारखे आपण त्याच काळात गोठून जातो. आपल्या बरोबरीचे लोकं आर्थिक, भावनिक, मानसिक, बौद्धिक बाबतीत पुढे निघून जातात, प्रगती करतात कारण ते वेळेत भविष्याच्या पाऊलखुणा ओळखतात.

छोटया बदलाने सुरवात करा आपल्याला कोणतीही नवीन गोष्ट आत्मसात करायची असेल, शिकायची असेल तर हळूहळू सुरवात करणे गरजेचे आहे. अचानक कोणताच बदल होवू शकत नाही त्यामुळे वेळ घ्या पण सुरवात करणे गरजेचे आहे.

फिक्स ऐवजी ग्रोथ माइंडसेट ठेवा “मला हे येत नाही” असा विचार करण्याऐवजी “मला हे अजून शिकायचे आहे” असा दृष्टिकोन ठेवा. चुका होणे हा शिकण्याचाच एक भाग आहे हे स्वीकारणे गरजेचे आहे. नवीन शिकताना चूक झाली म्हणून हताश होणे, प्रयत्न सोडून देणे, नशिबाला अथवा इतर कोणाला दोष देणे योग्य नाही.

फीडबॅककडे सकारात्मकतेने बघा तरच तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवून आणता येतील. घरातील, बाहेरील
कोणीहि बदल सुचवला तर तो तुमच्यावरचा वैयक्तिक हल्ला नसून, तुमच्या प्रगतीसाठी दिलेला सल्ला आहे असा दृष्टिकोन ठेवा. आपल्याला जर कोणी चांगल सांगत असेल तर त्याला शत्रू, विरोधक, दुश्मन समजू नका. सूचना देणाऱ्या व्यक्तीचा हेतू, त्याचा अनुभव आणि संबंधित विषयाबद्दल त्याला असलेली माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करा तरच तुम्ही तुमच्या कोषातून बाहेर पडू शकाल. आपल्याला सांगणारा कोण आहे यापेक्षा तो काय सांगतोय जे सांगतोय ते आपल्या भल्याच आहे का यावर विचार करून निर्णय घ्या.

लहान यशांचा आनंद साजरा करणे महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकता किंवा लहानसा सकारात्मक बदल करता, तेव्हा स्वतःचे कौतुक करा, स्वतःबद्दल अभिमान बाळगा. तुमच्या बद्दल चांगला विचार करणाऱ्या लोकांशी तुम्ही जो बदल करताय, जे शिकताय याबद्दल चर्चा करा. असे केल्यावर मेंदूला डोपामाइन (Dopamine) मिळते आणि नवीन बदल स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळते. दररोज आपल्या आयुष्यात ऐक तरी नवीन गोष्ट बघणे, समजावून घेणे, शिकणे, अंमलात आणणे या प्रक्रिया आपल्या शरीरासोबतच मनाचा, बुद्धीचा विकास घडवायला मदत करतात.

आत्मपरीक्षण (Self-Reflection) केल्याने पण आपल्याला खूप मदत होवू शकते. मला बदलाची भीती का वाटतेय? असा स्वतःला प्रश्न विचारा. स्वतःच्या भीतीचे मूळ शोधून काढल्यास त्यावर मात करणे सोपे जाते. एखादेवेळी आपल्याकडून चूक झालेली असणे, बदल घडवताना नुकसान झालेले असणे, बदलाचा प्रयत्न करतांना कोणी दुखावले गेले असेल, रागावले असेल किंवा आपल्याला त्रास झालेला असेल तरी भूतकाळातील नकारात्मक अनुभवामुळे आपण प्रयत्न सोडून देतो.

बदल, सुधारणा, नावीन्य आत्मसात करणे ही एका रात्रीत होणारी प्रक्रिया नाही. स्वतःला आणि इतरांना वेळ देणे, संयम ठेवणे आणि सातत्याने प्रयत्न करत राहणे यातूनच सकारात्मक व्यक्तिमत्त्व घडते. कोणत्याही वयाची, कुठल्याही नात्या मध्ये असलेली व्यक्ती जर आपल्याला चांगल काही सांगत असेल, त्यातून आपल्याला फायदा होणार असेल तर त्या ठिकाणी लहान मोठा, मान सन्मान अपमान या कल्पना बाजूला ठेवून शिकण्याची संधी घ्या.

काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे
9766863443

Comments are closed.