NGN News
Latest Marathi News

गुड न्यूज ! आर्थिक विकासात नाशिक चौथ्या क्रमांकावर

  • औद्योगिक, कृषी आणि आर्थिक केंद्र म्हणून नाशिकची वाटचाल; शहराची आर्थिक ताकद वाढली

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील औद्योगिक, कृषी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल, औषधनिर्मिती, अन्नप्रक्रिया, शेती, फलोत्पादन, वाइननिर्मिती, बांधकाम आणि लॉजिस्टिक्स अशा विविध क्षेत्रांमुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळत आहे. शासकीय आकडेवारी तसेच अलीकडील गुंतवणूक उपक्रमांमुळे राज्यातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून नाशिकची स्थिती अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते.

नाशिक जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित झाली आहे. नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेत सुमारे ₹६,४०४ कोटींच्या गुंतवणुकीचे १४२ सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले असून, त्यातून सुमारे १४,४०३ रोजगारनिर्मितीची क्षमता निर्माण होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, बांधकाम, अन्नप्रक्रिया आणि रसायन उद्योग हे जिल्ह्याच्या औद्योगिक विस्ताराला हातभार लावत आहेत.
नाशिकच्या आर्थिक प्रगतीचा प्रमुख आधार कृषी क्षेत्रही आहे. द्राक्षे, वाइन, फलोत्पादन आणि कृषीप्रक्रिया उद्योगामुळे शेती आणि उद्योग यांच्यातील दुवे अधिक मजबूत झाले आहेत. मुंबई आणि पुणे या प्रमुख आर्थिक केंद्रांच्या मधील भौगोलिक स्थान, तसेच रस्ते आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटीमध्ये होत असलेल्या सुधारणांमुळे उत्पादन आणि गुंतवणुकीसाठी नाशिकची आकर्षकता वाढली आहे.

ऑटोमोबाईल व ऑटो-कॉम्पोनंट, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी, अन्नप्रक्रिया आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही गुंतवणुकीला चालना मिळत आहे. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने नाशिक-अहिल्यानगर परिसरात औषधनिर्मिती व संबंधित उद्योगांचा विस्तार, ऑटो व ऑटो-कॉम्पोनंट क्लस्टरची निर्मिती तसेच अन्नप्रक्रिया उद्योगाला बळ देण्याच्या संधी अधोरेखित केल्या आहेत. दरम्यान, आगामी पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीमुळे बांधकाम, हॉटेल व्यवसाय, वाहतूक, पर्यटन, सेवा आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात अतिरिक्त मागणी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. कृषी निर्यात आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यावरही नाशिकच्या दीर्घकालीन विकासात भर दिला जात आहे.

जीडीपी २.३४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज
नाशिकच्या अर्थव्यवस्थेने अलीकडच्या काळात वेगाने वाढ नोंदवली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मुंबई, ठाणे आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्रातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. २०२४-२५ मध्ये नाशिकच्या सकल जिल्हा देशांतर्गत उत्पादनात (GDDP) १८.२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे यापूर्वी नाशिकपेक्षा पुढे असलेल्या नागपूरला मागे टाकत नाशिकने चौथा क्रमांक मिळवला आहे. सध्याच्या विकासाचा वेग कायम राहिल्यास जिल्ह्याचा जीडीपी सुमारे ₹२.३४ लाख कोटींवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचा मोठा वाटा
सातपूर, अंबड आणि गोंदे येथे विकसित झालेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी उद्योगांचा अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा आहे. त्याचबरोबर कांदा, द्राक्षे, वाइन आणि पर्यटनाशी संबंधित कृषीआधारित क्षेत्रांनाही चालना मिळत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा समृद्धी महामार्ग नाशिकच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठीही महत्त्वाचा ठरत आहे.

ओझर येथील *हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)*च्या सुविधेमुळे संरक्षण व एअरोस्पेस क्षेत्राला बळ मिळत आहे. नाशिकची जागतिक स्तरावर ओळख असलेली कांदा आणि द्राक्ष उत्पादनाची क्षमता निर्यातवाढीसाठी महत्त्वाची ठरत आहे. प्रस्तावित वाढवण बंदरामुळे नाशिकच्या औद्योगिक व आर्थिक विकासासाठी निर्यात आणि लॉजिस्टिक्सच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

@ तीर्थक्षेत्र ते उद्यमनागरी हा नाशिकचा प्रवास थक्क करणारा आहे. पायाभूत सुविधा, कृषी उद्योगाची भरारी, शिक्षण क्षेत्राची प्रगती, खासगी औद्योगिक क्षेत्राला आलेला बहर या बाबी नाशिकच्या विकासाला पूरक ठरत आहेत. एमआयडीसीचा विस्तार थांबला असला तरी खासगी विकासकांनी उद्योगनगरी उभारून शहराला वेगळे स्वरूप दिले आहे. संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी धोरण उद्योगांना बळ देणारे आहे. खानदेश पट्ट्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी नाशकात येत असल्याने शिक्षणाचा दर्जा वाढला आहे. वाईन उद्योग जोमात असल्याने अर्थकारण आणि पर्यटन सुदृढ बनले आहे. वाढलेली कनेक्टीव्हिटी आणि सिंहस्थात होणारी प्रस्तावित गुंतवणूक पर्यटनाला मोठा वाव देणारी ठरणार आहे.

  • डॉ. विनायक गोविलकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ, नाशिक

Comments are closed.