NGN News
Latest Marathi News

विद्यार्थिनीला चिठ्ठी..मानसिक तणाव आणि टोकाचे पाऊल ! दिंडोरीत..

** एनजीएन न्यूज नेटवर्क

दिंडोरी : विद्यार्थिनीला चिठ्ठी दिल्याची बाब उघड झाल्यानंतर मानसिक तणावाखाली येवून दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार दिंडोरी तालुक्यात उघड झाला आहे. हरिदास शेखरे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणाची वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, हरिदास हा जोपूळमधील एका आश्रमशाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. विद्यार्थिनीला चिठ्ठी दिल्याच्या कारणावरून त्याला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. या घटनेनंतर तो मानसिक तणावात असल्याची माहिती पुढे आली आहे. याच प्रकारातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आश्रमशाळेत धाव घेतली. हरिदासच्या मृत्यूमागील नेमके कारण समोर यावे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली. घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पालकांनी केली.

पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पालकांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर वातावरण निवळले. या घटनेने दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.