NGN News
Latest Marathi News

नाशिकच्या कुंदा बच्छाव यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षिकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी निवड झाली आहे. बीड जिल्ह्यातील कविता गीते आणि नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 18, आनंदवली येथील कुंदा जयवंत बच्छाव यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे नाशिकसह महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिले जातात. शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे तसेच समाजाच्या सहभागातून शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्कारासाठी गौरव केला जातो.

कुंदा बच्छाव यांच्या नावावर नावीन्यपूर्ण उपक्रमांची मालिका

नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली येथील शाळा क्रमांक 18 मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या कुंदा जयवंत बच्छाव यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने विविध अभिनव उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्याची दखल यापूर्वीही राज्यस्तरावर घेण्यात आली असून 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे.

बच्छाव यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘तारंग’ वाचनालयाची उभारणी केली. या वाचनालयात सुरुवातीला सुमारे एक हजार पुस्तके होती; लोकसहभागातून त्यात वाढ होऊन पुस्तकांची संख्या अडीच हजारांहून अधिक झाली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. NCERT आणि SCERTच्या विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले असून CIET-NCERTच्या शैक्षणिक वेबिनारमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे.


‘मोबाइल फ्री’पासून स्मार्ट अटेंडन्सपर्यंत
विद्यार्थ्यांचा मोबाइलचा वाढता वापर लक्षात घेऊन बच्छाव यांनी ‘मिशन मोबाइल-फ्री’सारखा अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांच्या घरांच्या भिंतींवर गणिती कोडी, इंग्रजी शब्दसंग्रह, सामान्यज्ञान आणि विविध शैक्षणिक माहिती रंगवून ‘ज्ञानाच्या भिंती’ तयार करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवत खेळता-खेळता शिक्षण घेण्याची संधी मिळाली.


विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी स्मार्ट अटेंडन्स प्रणालीची संकल्पनाही पुढे आणली. RFID आधारित ओळखपत्राद्वारे विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर आणि शाळेतून बाहेर पडल्यानंतर पालकांना मोबाइलवर संदेश मिळण्याची व्यवस्था करण्यात आली.
अंतराळ विज्ञानाची विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना NASAच्या Artemis-2 मोहिमेशी आभासी पद्धतीने जोडण्याचा उपक्रमही राबविला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अंतराळ मोहिमांविषयी माहिती घेतली.

राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीची दखल
कुंदा बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षांसह विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी सलग काही वर्षे NMMS आणि अन्य शासकीय शिष्यवृत्ती परीक्षांच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. तसेच NCERTच्या राष्ट्रीय बालकंटेंट स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या विद्यार्थ्याच्या व्हिडिओची निवड झाली होती.


दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्याची परंपरा आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी 4 आणि 5 सप्टेंबर रोजी पूर्वतयारी व पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण
कुंदा बच्छाव यांच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी झालेल्या निवडीमुळे नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्येही गुणवत्तापूर्ण आणि नावीन्यपूर्ण शिक्षणाचे प्रयोग होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान, वाचन, कला, विज्ञान आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून व्यापक संधी उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही पावती मानली जात आहे.
बीडच्या कविता गीते आणि नाशिकच्या कुंदा बच्छाव या दोन्ही शिक्षिकांची निवड महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांनाही नवे प्रोत्साहन मिळणार आहे.

Comments are closed.