
औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : मुंबई-पुण्याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे नवे केंद्र म्हणून नाशिकमध्ये मोठी क्षमता आहे. नाशिकला मॅन्युफॅक्चरिंग आणि संरक्षण उद्योगाचे हब बनविण्यासोबतच येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक येण्याचे सामर्थ असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
नाशिक दौऱ्यात चव्हाण यांनी विविध प्रमुख औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत नाशिकच्या औद्योगिक विकासासमोरील विविध समस्या, अडचणी तसेच भविष्यातील संधी जाणून घेतल्या. यावेळी नाशिकच्या उद्योगविश्वाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
नाशिकचा दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश, दिल्लीतील प्रगती मैदानाच्या धर्तीवर नाशिकमध्ये अत्याधुनिक प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटरची उभारणी, सिन्नर येथील इंडियाबुल्सची जागा उद्योजकांना उपलब्ध करून देणे, फूड अँड ड्रग्स विभागाच्या प्रयोगशाळेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देणे, या विषयांवर यावेळी चर्चा झाली.
नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याची गरज असल्याचे सांगत चव्हाण यांनी या विषयांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
नाशिकचे अनुकूल हवामान, मुबलक पाण्याची उपलब्धता, रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीची उत्तम कनेक्टिव्हिटी, तसेच मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागांच्या तुलनेने मध्यवर्ती ठिकाणी असलेले भौगोलिक स्थान ही नाशिकची मोठी बलस्थाने आहेत. या अनुकूल परिस्थितीचा प्रभावी वापर केल्यास भविष्यात नाशिकच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
उद्योजकांच्या एकजुटीमुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होत असून, उद्योग संघटनांच्या सामूहिक प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असे निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी निदर्शनास आणून दिले. उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, शासनस्तरावरील सकारात्मक निर्णय आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यास नाशिक देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून वेगाने पुढे येऊ शकते असे आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी सांगितले.
यावेळी निमा अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने, निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल, योगिता आहेर तसेच किरण खाबिया, राहुल गांगुर्डे, जयंत पगार आणि विनोद कुंभार यांनी चर्चेत सहभागी होत उद्योगांसमोरील समस्या तसेच नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत उपयुक्त सूचना मांडल्या.
नाशिकला केवळ उद्योगांचे शहर न ठेवता मॅन्युफॅक्चरिंग, संरक्षण उत्पादन, निर्यात आणि आधुनिक औद्योगिक गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दृष्टीने या बैठकीत झालेली चर्चा महत्त्वपूर्ण ठरली.
Comments are closed.